आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफ, मुलीला विमानतळावरच अटक; लंडनहून परतताच ताब्यात, इस्लामाबादला रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांची मुलगी मरियम यांना लंडनहून परतताच लाहोर विमानतळावर अटक झाली. चार्टर्ड विमानाने त्यांना इस्लामाबादला नेण्यात आले. रात्रभर रावळपिंडी अडियाळा तुरुंगात ठेवण्यात येईल. सकाळी न्यायालयात हजर केले जाईल. 


भ्रष्टाचाराच्या पैशातून नवाझ व मरियमने लंडनच्या एवेनफील्डमध्ये चार फ्लॅट खरेदी केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय पात्रता न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. नवाझ यांना १० वर्षे तर मरियम यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. कॅन्सरग्रस्त पत्नी कुलसुम यांच्यावर उपचारासाठी नवाझ व मरियम लंडनला गेले होते. नवाझ आणि मरियमच्या स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली होती. नवाझ यंाचे बंधू शाहबाज शरीफ यांनी विमानतळावर रॅली काढली होती. विमानतळाबाहेर २००० रेंजर्स तैनात होते. शहरातही १० हजार जवान होते. मोबाइल, इंटरनेट सेवा बंद होती. या घटनाक्रमात नवाझ यांचा पक्ष पीएमएल-एनला सहानुभूती मिळेल, असा अंदाज आहे. नवाझ आणि मरियम प्रवास करत असलेले विमान रात्री ९.१५ वाजता लाहोरच्या अलम्मा इक्बाल विमानतळावर पोहोचले. विमान लँड होताच डझनभर सुरक्षा रक्षक आत घुसले व दोघांचे पासपोर्ट जप्त केले. 


निवडणूक सभेत स्फोट, १२८ ठार 
पाकमध्ये शुक्रवारी निवडणूक सभेतील स्फोटात १२८ लोकांचा मृत्यू झाला. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात झालेल्या या आत्मघाती हल्ल्यात २०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये बलुचिस्तान अवामी पक्षाचे (बीएपी) उमेदवार नवाबजादा सिराज रायसैनी यांचा समावेश आहे. पीबी-३५ (मस्तुंग) येथून ते निवडणूक रिंगणात होते. 

 

नवाज म्हणाले : पुढील पिढ्यांसाठी बलिदान देण्यासाठी मायदेशी 

शरीफ यांनी पाकिस्तानात परतण्यापूर्वी लंडन येथे व्हिडिआे संदेश जारी केले. त्यात ते म्हणाले की, माझ्या हाती असलेले शक्य ते मी केले आहे. मला ठाऊक आहे. लाहोरला पोहोचताच तुरुंगात रवानगी होईल. पण हे बलिदान पुढील पिढ्यांसाठी देत आहे. देशाचे भवितव्य घडवण्यासाठी माझ्यासोबत वाटचाल करा, असे माझे जनतेला आवाहन आहे. मला फाशीवर लटकवले तरी बेहत्तर. 

 

आई म्हणाली, मुलगा निर्दोष, मीही तुरुंगात जाणार 

नवाझ शरीफ यांची आई बेगम शमीम अख्तर यांचा व्हिडिआे संदेश जारी झाला आहे. माझ्या मुलाला तुरुंगात पाठवल्यास मीही त्याच्यासोबत जाईन. माझा मुलगा निर्दोष आहे. पाकिस्तानचा पुत्र परत येतोय. त्याने देशाला प्रकाशमान केले आहे. त्याच्या माथ्याचे चुंबन घेता येईल, यासाठी तो येत आहे. मरियमने लंडनमधील मुलांसोबतचे छायाचित्र जाहीर केले आहे. 

 

हायकोर्ट : पीएमएल-एन समर्थकांची सुटका करा 

लाहोर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला पीएमएल-एनच्या काही समर्थकांची सुटका करण्याचे आदेश दिले. या समर्थकांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. पीएमएल-एनच्या ३७० कार्यकर्त्यांना अटक केली होती. लंडनमधील घराबाहेर काही जणांनी निदर्शने केली होती. नवाझ यांच्या नातू-पणतूंना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी निदर्शकांना मारहाण केली. लंडन पोलिसांनी दोघांना अटक केली.

 

१८ वर्षांनी इतिहासाची केली पुनरावृत्ती 

पाकिस्तानात १८ वर्षांपूर्वी मुशर्रफ यांनी देशाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हासारखीच परिस्थिती शुक्रवारी दिसून आली. १९९९ मध्ये तख्तपालटानंतर निर्वासित नवाझ २००० मध्ये मायदेशी परतले होते. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर गर्दी केली होती. तेव्हा मुशर्रफ यांनी नवाझ यांना रोखण्यासाठी समर्थकांवर लाठीमार करायला लावला होता. त्यांच्यासोबतच्या लोकांना अटक केली होती. 

 

बलुचिस्तानच्या प्रचारसभेत आत्मघाती हल्ल्यात ७५ जणांचा मृत्यू 
बलुचिस्तानच्या मस्तंग जिल्ह्यात शुक्रवारी एका प्रचार सभेत झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान ७५ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात बलुचिस्तान अवामी पार्टीचे उमेदवार नवाब जादा सिराज रायसनीचाही मृत्यू झाला. रायसनी बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब अस्लम रायसनी यांचे धाकटे बंधू आहेत. जखमींना क्वेट्टाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. २०११ मध्ये रायसनीने एका दहशतवादी हल्ल्यात १४ वर्षीय मुलाला गमावले होते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, नवाझ शरीफ पाकिस्‍तानात परतले तेव्‍हाचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...