आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे; स्विडिश संस्थेचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पाकिस्तान अण्वस्त्र निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करत असून भारताच्या तुलनेत पाककडे अधिक अण्वस्त्र साठा असल्याचा दावा स्टॉकहोम इंटरनॅशलन पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिप्री) अहवालात केला आहे. चीनकडे भारताच्या तुलनेत दुप्पट अण्वस्त्रे असल्याचेही यात म्हटले आहे. पाकिस्तानकडे १४० ते १५० अण्वस्त्रे यावर्षी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये १० अण्वस्त्रांची भर पडली आहे. भारताकडे मात्र १३० ते १४० अण्वस्त्रे आहेत. वार्षिक अण्वस्त्र अहवाल सिप्रीने नुकताच सादर केला आहे. नि:शस्त्रीकरण, शस्त्र नियंत्रण आणि अप्रसारण कार्यक्रमांसाठी सिप्री संशोधन करते. 


भारत व पाकिस्तान वेगाने आपल्या अण्वस्त्र साठ्यात वाढ करत आहेत. जमीन, समुद्र व हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा विकासही दोन्ही देशांत अग्रक्रमाने केला जात आहे, असे या अहवालात म्हटले आहे. चीन आपल्या अण्वस्त्र प्रक्षेपण प्रणालीचे आधुनिकीकरण करत असून अण्वस्त्र वाढ हा सध्या तरी चीनचा प्राधान्यक्रम नाही, असे सिप्रीच्या अहवालात म्हटले आहे.

 
२०१८ मधील अण्वस्त्रांची संख्या 
- अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांकडे मिळून १४,४६५ अण्वस्त्रे आहेत. 
- २०१८ च्या प्रारंभीची ही आकडेवारी आहे. यापैकी ३,७५० अण्वस्त्रे सज्ज (तैनात) केलेली आहेत. 
- वर्ष २०१७ च्या प्रारंभी हीच संख्या १४,९३५ होती. 


अण्वस्त्रमुक्तता हा अजेंडा सध्या अशक्य 
अण्वस्त्र नियंत्रण करारावर वर्ष २०१० मध्ये अमेरिका आणि रशियाने स्वाक्षरी केली होती. याचे पालन होत असल्याचे २०१८ च्या आकडेवारीवरून दिसून येते. वर्ष २०१७ च्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. स्ट्रॅटेजिक ऑफेन्सिव्ह आर्म्स (न्यू स्टार्ट) कराराचे पालन उभय देश करत असल्याचे सिद्ध झाल्याचे स्टॉकहोम येथील सिप्री संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. रशिया, अमेरिका आणि इतर अण्वस्त्रसज्ज देश आपल्याकडील साठा कमी करत असले तरीही अण्वस्त्र प्रक्षेपण प्रणालीचे आधुनिकीकरण सर्वच देश करत आहेत. याशिवाय क्षेपणास्त्र, युद्ध विमाने, अण्वस्त्र निर्मिती प्रकल्पांचा विकासही होत आहे. अण्वस्त्रमुक्तता हा अजेंडा अद्याप तरी या देशांनी ठेवलेला नाही, असे संशोधक शॅनन किले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...