काबूल / वॉशिंगटन - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना इसिसचा अफगाणिस्तानातील म्होरक्या अब्दुल हसीब ठार झाला आहे. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि अफगाणिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सोमवारी अधिकृत दुजोरा दिला आहे.
अमेरिकन लष्कराच्या माहितीप्रमाणे...
अमेरिका आणि अफगाणिस्तान विशेष संयुक्त दलाने 10 दिवसांपूर्वी नंगरहार प्रांतात दहशतवाद विरोधी हल्ले केले होते. त्याच हल्ल्यांमध्ये हसीब आणि त्याचे इतर सहकारी दहशतवादी ठार झाले आहेत. त्यावेळी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागनने हसीब ठार झाला असावा अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्कामोर्तब केला.
कोण होता अब्दुल हसीब
अफगाणिस्तानात इसिसचा म्होरक्या गतवर्षी अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार मारले होते. त्यानंतर हसीबला अफगाण इसिसचा प्रमुख नियुक्त करण्यात आले. काबूल रुग्णालयावर हल्ला करण्यासाठी तोच सूत्रधार होता. याच वर्षी मार्चमध्ये झालेल्या या हल्ल्यात अबाल वृद्धांसह 50 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. 8 मार्च रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली होती.