आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghanistan's Taliban Say Mullah Omar Is Alive And Well

कडवा तालिबानी नेता मुल्ला ओमर जिवंतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानमध्ये कार्यरत राहून अनेक देशांत दहशतवादी कारवायांनी क्रौर्य माजवणार्‍या तालिबान संघटनेचा म्होरक्या व सर्वोच्च नेता मुल्ला ओमर अद्याप जिवंत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

सध्या जगभरात घडत असलेल्या घडामोडींसंदर्भात तो माहिती घेत असल्याचा तालिबानी संघटनेचा दावा असून तो उत्तमरीत्या कार्यरत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ओमर याने तालिबानचे नेतृत्व स्वीकारल्याला १९ वर्षे पूर्ण होत आहेत. हा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी तालिबान्यांनी एक प्रदीर्घ निवेदन प्रसिद्धीस दिले असून यात ओमरबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

एका डोळ्याने अंध असलेल्या ओमरचे नेमके काय झाले याबद्दल कोणत्याही देशाला नििश्चत माहिती नाही. तो एक तर गंभीर आजारी असावा किंवा त्याचा मृत्यू झाला असल्याने अशात त्याचे नाव प्रकाशझाेतात नसल्याचे मानले जात होते. मात्र, तालिबानी संघटनेने आपल्या संकेतस्थळावर चार भाषांत प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात मुल्ला ओमर जिवंत असल्याचे म्हटल्याने पाश्चिमात्य देशांसह अमेरिकेचे कान टवकारले आहेत.

सध्या अफगाणिस्तान व जगात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीची ओमरला इत्थंभूत माहिती आहे. ९/११च्या अमेरिकेवरील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीविरुद्ध अमेरिकेने २००१ मध्ये युद्ध पुकारले. या काळात ओमर भूमिगत झाला होता. त्याच्या डोक्यावर अमेरिकेने १ कोटी डॉलरचे बक्षीसही ठेवले आहे. दरम्यान, अफगाणमधून नाटो फौजांच्या माघारीनंतर आता तालिबानचा या भागातील प्रभाव पुन्हा वाढत चालला असून अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागामध्ये तालिबानने सत्ता गाजवण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी शरिया कायद्याची काही गावांत अंमलबजावणी सुरू केली आहे. तोव येथील नागरिकांकडून कर वसूल केला जात आहे.

पाकिस्तानमध्ये दोन कैद्यांना फाशी
पाकिस्तानमध्ये मंगळवारी मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या दोन कैद्यांना फाशी देण्यात आली. नवाज शरीफ सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती उठवल्यानंतर आतापर्यंत ६८ दोषींना फाशी देण्यात आली आहे. तालिबानने पेशावरच्या लष्करी शाळेत केलेल्या हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी सरकारने फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती उठवली. पाकमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेले कैदी आठ हजारांवर आहेत. सुरुवातीस दहशतवादी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, सरकारने १० मार्च रोजी सर्व प्रकरणांत फाशी झालेल्या गुन्हेगारांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला.