ढाका - भारत आणि बांगलादेशादरम्यान ४१ वर्षे जुना जमीन आदलाबदलीचा करार लागू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत बांगलादेश किंवा भारत या दोन्हीपैकी एकाही देशाचे नागरिकत्व नसलेल्या ४०-४५ हजार लोकांना एका देशाचे नागरिकत्व मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या बांगलादेश दौ-यात शनिवारी या कराराच्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण झाली. या वेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. जमीन सीमा करार नावाचे हे विधेयक ७ मे रोजीच संसदेत मंजूर झाले होते. हा करार १९७४ मध्ये झाला होता, परंतु आजवर तो लागू होऊ शकला नव्हता. आता भारताकडून १७,१५८ एकरांवरील १११ वसाहती बांगलादेशच्या तर त्या बदल्यात बांगलादेशाकडून ७,११० एकरावरील ५१ वसाहती भारताच्या स्वाधीन केल्या जातील. या वसाहतींतील नागरिकांना भारत किंवा बांगलादेशात वास्तव्य करण्याचा पर्याय असेल. ‘जमीन सीमा करार लागू करण्याच्या दस्तऐवजांच्या देवाणघेवाणीमुळे इतिहास घडला,’ असे ट्विट मोदींनी केले आहे. तत्पूर्वी मोदींनी १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले युद्ध स्मारक आणि बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजिबूर रहमान संग्रहालयात जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
भारताचे प्रेम घेऊन आलो : मोदी
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शिष्टाचार मोडून मोदींच्या स्वागतासाठी ढाका विमानतळावर गेल्या. त्यांच्यासोबत अनेक मंत्रीही होते. त्याचे छायाचित्र मोदींनी ट्विट केले. दुस-याट्विटमध्ये मोदी म्हणाले, ‘नमस्कार बांगलादेश! मी भारताच्या लोकांचे प्रेम आणि सद्भावना घेऊन आलो आहे.’ बांगलादेशच्या बीएनपी या विरोधी पक्षानेही भारताशी चांगल्या संबंधांचा आग्रह धरला आहे.
दोन नवीन बससेवाही सुरू
मोदींनी शनिवारी कोलकाता-ढाका- आगरतळा आणि ढाका- शिलाँग- गुवाहाटी या दोन बससेवा सुरू केल्या. आधी कोलकात्याहून आगरतळ्याला जाण्यासाठी १६५० किमी अंतर पडत होते. आता ढाका मार्गे गेल्याने ते कमी होऊन ५६० किमीवर येईल. या मार्गावर पश्चिम बंगाल सरकारची एक आणि त्रिपुरा सरकारची एक अशा दोन बसेस चालतील. ढाका- गुवाहाटी ही बस बांगलादेश सरकार चालवणार आहे. सध्या ढाका- कोलकाता आणि ढाका-आगरतळा
अशा वेगवेगळ्या बसेस सुरू आहेत.
असा होईल फायदा
>भारताचा बांगलादेशाशी सुरू असलेला सीमाप्रश्न संपुष्टात येईल.
>दोन्ही देशांदरम्यान ६.१ किलोमीटरची अचिन्हित सीमा निश्चित होईल.
>बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाचा.
>आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मेघालयाचा भाग या अंतर्गत येतो.
>या करारामुळे दोन्ही देशांतील समन्वय अाणखी सुधारण्यासही मदत होईल.
उभय देशांत २२ करार, भारत देणार २ अब्ज डॉलर मदत
मोदींच्या या दौ-यात भारतआणि बांगलादेशात द्विपक्षीय व्यापार, जलवाहतूक, मानवी तस्करी आणि बनावट नोटांच्या प्रसाराला प्रतिंबधांसह २२ करार झाले. भारताने बांगलादेशला २ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचाही करार केला आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरनेही तीन अब्ज डॉलर गुंतवणुकीतून तेथे ३००० मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पाचा करार केला आहे.