आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळेवेगळे डिजिटल घड्याळ बनवणा-या अहमद मोहंमदने मागितली भरपाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होस्टन- अभियंता होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अहमद मोहंमदने एक आगळेवेगळे डिजिटल घड्याळ तयार केले. मात्र, ते घड्याळ म्हणजे स्फोटकांचे सर्किट असल्याच्या संशयावरून त्याला शाळेतच पोलिसांनी अटक केली. नंतर सत्य बाहेर आले आणि त्याला अमेरिकेत खूप सन्मान मिळाला. तरीही यामुळे झालेली बदनामी आणि मानसिक त्रासापोटी १५ दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. या व्यतिरिक्त आयर्विंग शहराचे महापौर व पोलिस प्रमुखांनी या प्रकरणी माफी मागावी, अशीही त्याच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

१४ वर्षीय अहमद मोहंमद टेक्सासमधील आयर्विंग शहरात एका शाळेत शिकत होता. काहीतरी वेगळे करण्याचा छंद आणि अभियंता होण्याची तीव्र इच्छा यामुळे तो नेहमी डिजिटल विश्वात रममाण असे. या जिद्दीतूनच त्याने एक डिजिटल घड्याळ तयार केले व शाळेत दाखवण्यासाठी नेले. मात्र, कौतुक होण्याऐवजी घडले वेगळेच. शिक्षकांना वेगळाच संशय आला आणि अहमद मोहम्मद याला थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अहमद आपण तयार केलेले घड्याळ दाखवत असताना तो आपल्याला भीती दाखवत असल्याचा संशय शिक्षकांना आला. अहमदला अटक करण्यात आली. सखोल चौकशीअंती खरा प्रकार पोलिसांच्या लखात अाला आणि त्याला सोडून देण्यात आले.

या प्रकारानंतर अहमद यास व्हाइट हाउस आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्याकडून भेटीचे निमंत्रण मिळाले होते. मात्र, या प्रकारानंतर अहमद याच्या कुटुंबीयांनी अमेरिका सोडून थेट कतारमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
वकिलामार्फत सादर केले मागण्यांचे पत्र
अहमदच्या कुटुंबीयांनी वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात आयर्विंग शहराचे महापौर आणि पोलिस प्रमुखांनी लेखी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. शिवाय बदनामी व मानसिक त्रासाबद्दल १५ दशलक्ष डॉलरची भरपाई द्यावी, असेही पत्रात नमूद आहे. यातील १० दशलक्ष डॉलर महापौरांनी आणि ५ दशलक्ष डॉलर शाळेने द्यावेत, असे यात नमूद आहे. येत्या साठ दिवसांत यावर काही निर्णय झाला नाही तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही पत्रात आहे.