आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवरूनच सर्व कामे करून घेणारे नगर, मदत मागतात, तक्रारी देतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हून (स्पेन)- खरे तर टि्वटर हा १४० शब्दांत आपले मनोगत मांडण्याचे माध्यम. परंतु स्पेनमधील एका वसाहतीसाठी मात्र संपर्काचे ते एक प्रमुख साधन ठरले आहे. या वसाहतीचे नाव आहे हून. लोकसंख्या सुमारे ४ हजार. या ठिकाणी प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट ट्विटच्या माध्यमातूनच होते. टि्वटरवर चालणारी पहिली वसाहत असेही हूनला म्हणता येऊ शकेल.


मागील चार वर्षांपासून ट्विटर हेच येथील लोकांचे संपर्काचे साधन ठरले आहे. लोकांचे कमालीचे ट्विटरवेड पाहायचे तर येथील महापौरांचे कार्यालय पाहावे. स्पेनचा राजा किंवा पंतप्रधानांच्या तसबिरीऐवजी या कार्यालयात ट्विटरच्या निळ्या चिमणीचा लोगो लटकलेला दिसतो. महापौर जोस अँटोनियो राॅड्रिग्ज यांना एखादा आदेश काढायचा असेल तर ते चक्क ट्विट करतात. तसेच एखाद्याला रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक सोयींसंबंधी तक्रार करायची असेल तर तो महापौरांना ट्विट करतो.
तक्रारींचा निपटारा करण्याची कालमर्यादा सर्वांत कमी म्हणजे साडेतीन मिनिटांची आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणचा पथदिवा नादुरुस्त असल्याची तक्रार येताच महापौर कार्यालयातील इलेक्ट्रिशियन घटनास्थळी जातो. दिवा दुरुस्त करतो आणि तक्रारदाराला ट्विटरवरून काम पूर्ण झाल्याचा फोटो पाठवून देतो. याशिवाय शाळांमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा मेनूही पालकांना ट्विटरवरून कळवला जातो. सार्वजनिक सेवांखेरीज हूनचा पोलिस आणि आरोग्य विभागही ट्विटरवरच चालतो. कोणी मदतीसाठी ट्विट केले तर पाच मिनिटांत पोलिस घरी येतात. पोलिसांची वर्दी आणि त्यांच्या कारवरही टि्वटर हँडल लिहिलेले असते.


वसाहतीत कोणी एखादा आजारी पडला तर रुग्णालयाला ट्विट केले जाते. संबंधित डाॅक्टर रुग्णाला अपाॅइंटमेंट देतो. रुग्णालयात जाण्याच्या स्थितीत तो नसेल तर त्याने ट्विट करताच अँम्ब्युलन्स दारात येते. रुग्ण रुग्णालयात पोहोचल्याचे, उपचार पूर्ण झाल्याचे ट्विट त्याच्या नातलगांना केले जाते. वसाहतीत एखादे मूल जन्माला आले किंवा कोणाचा मृत्यू झाला तर तेदेखील लोक ट्विटरवरूनच कळवतात.
बातम्या आणखी आहेत...