वॉशिंग्टन - अमेरिकेने १४ युद्धविमाने, ५९ ट्रेनर जेट्स आणि ३७४ रणगाडे पाकिस्तानला सुपूर्द केले आहेत. ही युद्धसामग्री अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान व इराक मोहिमांसाठी वापरली होती. अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य काढून घेतले आहे. त्यानंतर येथील युद्धसामग्री पाकला सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकला जेट विमानांसारखी सामग्री देण्यास यापूर्वी भारताने विरोध दर्शवला होता. पाकने नवी १८ फाल्कन युद्धविमानेही अमेरिकेकडून खरेदी केल्याचे येथील अधिकृत सूत्रांनी सांगितले. यांची किंमत १.४३ अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे व इतर स्फोटकांचीही खरेदी करण्यात आली असून ६२९ दशलक्ष डॉलर्सची ही खरेदी आहे. पाकच्या काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिसने हा तपशील दिला.
इंटरनॅशनल मिलिट्री एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत पाकच्या २००० पेक्षा जास्त लष्करी अधिका-यांच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेने अर्थसाहाय्य केले. त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पुढाकारही घेतला. वर्ष २००१ पासून अमेरिकेने पाकिस्तानला युद्धसाहित्यात भरघोस मदत केली आहे. गेल्या महिन्यात अमेरिकन परराष्ट्र खात्याने फॉरेन मिलट्री फायनान्सिंगअंतर्गत पाकिस्तानला ९५२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत करण्याचे मंजूर केले. यात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि हेलिफायर क्षेपणास्त्र पाकला देण्याचे मान्य करण्यात आले.