आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांची आज अग्निपरीक्षा, डेमोक्रॅटिक पक्ष संसदेत महाभियोग आणण्याच्या तयारीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मंगळवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी) संसदेत अग्निपरीक्षा होईल. ते काँग्रेसला म्हणजेच संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला आपल्या प्राथमिकता आणि आतापर्यंत केलेले काम व उपलब्धी यांची माहिती देतील. दुसरीकडे विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. 
 
जर या पक्षाला प्रस्ताव आणण्यात यश मिळाले तर अमेरिकेत एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात पहिल्यांदाच एवढ्या कमी वेळेत असा प्रस्ताव आणल्याची नोंद होईल. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रथमच संसदेत बोलतील.  
 
संसदेच्या दोन्ही सभागृहांत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता नाही. रिपब्लिकन पक्षात भलेही ट्रम्प यांचे विरोधक जास्त असले तरी आपल्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अशा पद्धतीने हटवले जावेत, अशी त्यांची इच्छा नसेल. अमेरिकेत महाभियोगाद्वारे राष्ट्राध्यक्षाची हकालपट्टी झाली, त्याचा मृत्यू झाला किंवा त्याने राजीनामा दिल्यास निवडणूक घेण्याची व्यवस्था नाही. तेथे चार वर्षांच्या एकूण कार्यकाळापैकी उर्वरित काळासाठी उपाध्यक्षालाच राष्ट्राध्यक्ष करण्यात येते. 
 
काँग्रेसला संबोधित केल्यानंतर ट्रम्प हे निर्वासित आणि स्थलांतरितांशी संबधित नव्या आदेशावर स्वाक्षरी करतील. ते गेल्या आठवड्यातच या आदेशावर स्वाक्षरी करणार होते; पण आता कुठलीही अडचण येऊ नये अशा रीतीने ते स्वाक्षरी करतील, असे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.  

३० दिवसांत ८० खोटे दावे  
ट्रम्पविरोधी रिपब्लिकन नेत्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग आणला जावा. त्यांनी ३० दिवसांत ८० खोटे दावे केले आहेत. ते वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहेत.  

निक्सन यांनी दिला होता राजीनामा, क्लिंटन यांच्याविरोधातील आरोप झाले होते खारीज   
महाभियोगानंतर रिचर्ड निक्सन या एकमेव अध्यक्षाने राजीनामा दिला आहे. डिसेंबर १९९८ मध्ये अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आला होता; पण फेब्रुवारी १९९९ मध्ये सिनेटने त्यांच्याविरोधातील आरोप खारीज केले होते.  

संरक्षणाचा खर्च वाढणार; परराष्ट्र, पर्यावरणाचा घटणार : व्हाइट हाऊसने सोमवारी विविध विभागांच्या अर्थसंकल्पीय तरतुदी तयार केल्या आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांच्या इच्छेनुसार यंदा संरक्षण खर्चात वाढ करण्यात आली आहे, तर परराष्ट्र, पर्यावरणासह इतर खर्चात कपात करण्यात आली आहे. अमेरिका दरवर्षी लष्करावर ६०० अब्ज डॉलर (सुमारे ४० लाख कोटी रुपये), तर परराष्ट्र आणि परराष्ट्र साहाय्यावर ५० अब्ज डॉलर (सुमारे ३.३ लाख कोटी रुपये) खर्च करतो. अद्याप अर्थसंकल्पीय तरतुदी जाहीर करण्यात आल्या नाहीत.  

शहीद जवानाचे वडील म्हणाले-ट्रम्प यांना भेटायचे नाही  : ट्रम्प हे अध्यक्ष झाल्यानंतर परदेशात शहीद झालेले एकमेव अमेरिकी सील कमांडो विल्यम ओवेन्स यांच्या वडिलांनी अध्यक्षांची भेट घेण्यास नकार दिला आहे. येमेनमधील लष्करी कारवाईदरम्यान विल्यम्स शहीद झाले होते. विल्यम्स यांचे वडील बिल ओवेन्स यांनी, ‘ट्रम्प यांना येमेनमध्ये लष्करी कारवाईसाठी परवानगी देण्याची गरज काय होती?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. या कारवाईत ओवेन्स यांच्यासह १६ जण ठार झाले होते. त्यात ८ महिला आणि ८ मुलांचा समावेश होता. 

नौदल सचिव पद; फिलिप बिल्डन यांनी नामांकन घेतले मागे   
ट्रम्प यांनी नौदल सचिव पदासाठी नियुक्त केलेले फिलिप बिल्डन यांनी पदभार सांभाळण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, मी विद्यमान आणि आगामी आव्हानांचा सामना करण्यास तयार नाही. त्यामुळे मी नाव मागे घेत आहे. ट्रम्प यांनी लष्करी सचिव म्हणून नियुक्त केलेले विन्सेन्ट वियोला यांनीही नाव मागे घेतले होते. संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी फिलिप बिल्डन यांनी नाव मागे घेतल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...