आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने पाकची ३० कोटी डॉलर्सची लष्करी मदत रोखली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने ३० कोटी डॉलर्सची लष्करी मदत रोखल्याने पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेविरोधात पाकिस्तान समाधानकारक कारवाई करत आहे, असे प्रमाणपत्र काँग्रेसला देण्यास संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांनी नकार दिल्याने संरक्षण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर खर्च करत आहे. त्याची भरपाई करण्यासाठी ‘कोअॅलिशन सपोर्ट फंड’च्या (सीएसएफ) माध्यमातून हा निधी देण्यात येतो. ‘संरक्षणमंत्र्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने ३० कोटी डॉलर्सचा निधी रोखण्यात आला आहे,’ अशी माहिती पेंटॅगॉनचे प्रवक्ता अॅडम स्टम्प यांनी दिली. या व्यवस्थेअंतर्गत पाकिस्तानला २०१५ या वर्षात एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ७० कोटी डॉलर्स एवढी रक्कम पाकिस्तानला देण्यात आली आहे. उर्वरित ३० कोटी डॉलर्सची रक्कम रोखण्यात आली आहे.

स्टम्प म्हणाले की, पाकिस्तानचा निधी रोखण्यात आला असला तरीही त्याचा अर्थ पाकिस्तानी लष्कराने गेल्या दोन वर्षांत केलेली कामगिरी कमी महत्त्वाची ठरत नाही. पाकिस्तानने उत्तर वजिरीस्तानात केलेल्या कारवाईची आम्ही प्रशंसाच करतो. आधी उत्तर वजिरीस्तान आणि फता हे भाग दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्वर्ग होते. पाकिस्तानच्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांच्या कारवाईस आळा बसला आहे.हक्कानी नेटवर्कचा अपहरणाच्या अनेक घटनांत सहभाग असून संघटनेच्या दहशतवाद्यांनी अमेरिका, अफगाण सरकार तसेच अनेक नागरिकांवरही हल्ले केले आहेत. या गटाने २००८ मध्ये काबूलमधील भारतीय दूतावासावरही हल्ला केला होता. या हल्ल्यात ५८ जण ठार झाले होते.
सर्वाधिक निधी पाकिस्तानला
‘सीएसएफ’च्या माध्यमातून सर्वाधिक निधी पाकिस्तानला दिला जातो. २००२ पासून पाकिस्तानला १४ अब्ज डॉलर्स एवढा निधी देण्यात आला आहे, अशी माहितीही स्टम्प यांनी दिली.
अमेरिका-पाकिस्तान संबंधांना धक्का
याबाबतचे पहिले वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले होते. अमेरिकेने पाकिस्तानची ३० कोटी डॉलर्सची मदत रोखणे हा द्विपक्षीय संबंधांना मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया वॉशिंग्टन पोस्टने व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...