आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माघार घेणार नाही’, ट्रम्प अडून; ३४ संसद सदस्यांनी सोडली साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प ११ वर्षांपूर्वीच्या व्हिडिआेमुळे अडचणीत सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या चर्चेच्या एक दिवस अगोदर ३४ रिपब्लिकन खासदारांनी त्यांची साथ सोडली. त्यापैकी सात जणांनी हिलरींना मतदान करू, असे जाहीरपणे सांगूनही टाकले. मात्र आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही. माघार घेणे शिकलोच नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांच्यातील दुसरी चर्चा सोमवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) होणार आहे. त्यात ट्रम्प यांच्या महिला विरोधी विधाने हिलरी यांच्या निशाण्यावर असतील, हे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांचा यासंबंधीचा व्हिडिआे समोर येण्याच्या दुसऱ्याच दिवशी २० खासदारांनी त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाऊ नये, अशी मागणी केली. काही खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान करू, असे जाहीरही करून टाकले. रिपब्लिकनच्या संतप्त खासदारांकडे कानाडोळा करून ट्रम्प मात्र आपल्या भूमिकेवर अडून आहेत. मी आयुष्यात कधीही मागे पाऊल टाकलेले नाही. माघार घेणारही नाही. मला राष्ट्राध्यक्षपदासाठी चांगला पाठिंबा आहे. मी या शर्यतीमधून माघार घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांचे सहकारी पेन्सही संभ्रमात आहेत.
जॉन मॅक्कन, जॉर्ज बुश (सीनियर) यांनी पाठिंबा घेतला मागे : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (सीनियर), जॉन मॅक्कन, मिट रोमनी, सुसॅन कॉलिंग यांच्यासह ३४ रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. बुश यांच्यासह सात नेत्यांनी हिलरी यांच्या बाजूने मत देण्याची घोषणा केली. मात्र सभागृहाचे सभापती रेयान यांच्यासह अनेक नेते अजूनही ट्रम्प यांच्यासोबत आहेत.
भारतवंशीय समुदायही विरोधात : अमेरिकेतील भारतवंशीय समुदायही ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे अलीकडेच करण्यात आलेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. ते अगोदर ट्रम्प यांचे समर्थन करत होते, परंतु आता समीकरण बदलले आहे. त्यामुळे भारतीय समुदाय डेमोक्रेटिकला पाठिंबा देऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...