वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परदेशांतून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. त्यावरून डेमोक्रॅट खासदार त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी केेलेल्या कमाईचा तपशील जाहीर केला. जगभरात पसरलेल्या गोल्फ कोर्समधून त्यांनी २८.८ कोटी डॉलर्स (सुमारे १८५६ कोटी रुपये) कमाई केल्याचे ९८ पानी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात न्यूजर्सीतील बॅडमिन्सटर क्लबच्या १.९८ कोटी डॉलरच्या उत्पन्नाचाही समावेश आहे.
ट्रम्प यांची स्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांची माहिती ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट एथिक्सकडून जारी केली आहे. हा अहवाल जानेवारी २०१६ ते १५ एप्रिल २०१७ दरम्यानच्या तपशिलावर आधारित आहे. या कालावधीत फ्लोरिडात खासगी रिसोर्ट मार-ए लॅगोमधून ट्रम्प यांनी ३.७२ कोटी डॉलर (सुमारे २३९.७ कोटी रुपये) कमाई केली. ही रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत ७४ लाख डॉलरने जास्त आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे स्वागत केले होते आणि सिरियावर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचे आदेशही दिले होते. गेल्या वर्षी क्लबने सदस्य शुल्क दुपटीने वाढवले आहेत.वॉशिंग्टनच्या आलिशान हॉटेलच्या माध्यमातून ट्रम्प यांची १.९७ कोटी डॉलरची घसघशीत कमाई झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरे तर हे हॉटेल वादग्रस्त आहे. कारण ट्रम्प यांच्या भेटीसाठी आलेले देशोदेशींचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान याच हॉटेलमध्ये मुक्काम करू लागले आहेत. त्यामुळे हे हॉटेल वादात सापडले आहे.
ओबामा यांचे क्युबा धोरण बदलले
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबा बाबतच्या गत राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या धोरणात बदल केला आहे. ट्रम्प यांनी क्युबावर नवीन प्रवासी व्यापारविषयक निर्बंध लावले आहेत. आेबामा यांनी केलेल्या कराराचे ट्रम्प यांनी ‘भयंकर दिशाभूल करणारे’ अशा शब्दांत वर्णन केले. प्रवास व्यापारविषयक नियमांत आेबामा प्रशासनाने शिथिलता आणली होती. त्यातून क्युबाच्या लोकांना काहीही मदत होणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचार मोहिमेतही क्युबाच्या कराराला विरोध केला होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हा करार रद्द करण्यात येईल, असे आश्वासनही तेव्हा त्यांनी दिले होते.