आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या ‘किल लिस्ट’वर इराकमधील आयएसचे तळ, बगदादी खात्मा करण्याची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे इराक-सिरियातील तळ अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचाही खात्मा करण्याची योजना आहे. आतापर्यंत यादीनुसार अतिरेक्यांच्या विरोधात सातत्याने यशस्वी कारवाया झाल्या आहेत, असा दावा अमेरिकी मीडियातून करण्यात आला आहे.

वास्तवात सध्या अमेरिकेचे सैन्य इराक किंवा सिरियात तैनात नाही. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ‘किल लिस्ट’ तयार केली आहे. अमेरिकेच्या खात्मा करण्याच्या यादीत बगदादीचा क्रमांक सर्वात वरचा आहे, असा दावा अमेरिकी अधिका-याच्या हवाल्याने ‘सीएनएन’ने केला आहे. अमेरिका आपला शोध घेत आहे, याची माहिती बगदादीला असल्यामुळे तो अतिशय गुप्त ठिकाणी दडून बसला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला गेल्या महिन्यात तो दडून बसलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. ते ठिकाण बगदादीने आता बदलले आहे. आयएसच्या कारवाया कशा प्रकारे नियंत्रित केल्या जातात, त्याचा नेमका तपशील मिळवणे अमेरिकी गुप्तचरांना अजूनही आव्हानात्मक वाटते. नेमकेपणाने कोणाच्या आदेशावरून कारवाई केली जाते, हे जाणून घेतल्यानंतरच कारवाई स्पष्ट होऊ शकेल, असे गुप्तचरांना वाटते.

* म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी टार्गेट नंबर १

लढाऊ विमाने मागावर
अमेरिकेने बगदादीच्या शोधासाठी लढाऊ विमाने सोडलेली आहेत. त्याची माहिती बगदादीलादेखील आहे. त्यामुळे तो अतिशय सावधपणे हालचाली करत असल्याचे गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अनेकांना कंठस्नान
इस्लामिक स्टेटच्या अनेक दहशतवाद्यांचा अमेरिकेने या अगोदरच नियोजनपूर्वक खात्मा केला. अमेरिकेच्या यादीत आयएसचे अनेक रासायनिक शस्त्रतज्ज्ञही रडारवर आहेत. दहशतवादी संघटनेचे जाळे नष्ट करण्यास मदत होऊ शकेल अशा दहशतवाद्यांना शोधून मारण्यावर अमेरिकेचा भर आहे.

आदेश रचनेचे गुप्तचरांना आव्हान
अमेरिकेने आयएसच्या विरोधात प्रत्यक्षात हवाई कारवाया सुरू केल्या आहेत; परंतु दहशतवादी संघटनेची आदेश रचना समजून घेण्यात अजूनही गुप्तचर यंत्रणेला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे आयएसचा पूर्ण खात्मा करणे तितके सहज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागप्रमुखपदी जोसेफ क्लॅन्सी
अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी जोसेफ क्लॅन्सी यांच्या नावाची घोषणा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. क्लॅन्सी हे यापूर्वी विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून काम करत होते. आता त्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २७ वर्षांपासून क्लॅन्सी गुप्तचर विभागाच्या सेवेत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांनी या सेवाकालात पार पाडली आहे.

पुढे वाचा, लादेनची इच्छा : अल-कायदाचे रिब्रँडिंग