आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानला कोण वाळीत टाकेल?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक राजकारणात दहशतवादाचा मुद्दा हा कळीचा आहे. या बाबतीत सर्वांचंच एकमत आहे. अगदी पाकिस्तानही त्यात सहभागी आहे; कारण आम्हीही दहशतवादाशी मुकाबला करत आहोत, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, भारताच्या भूमिकेला जग पाठिंबा द्यायला तयार नाही.

प्याला अर्धा भरला आहे की अर्धा रिकामा आहे, ते बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. दहशतवादाबाबत हीच परिस्थिती कशी आहे, ते गेल्या काही आठवड्यात स्वच्छपणे प्रकाशात येत गेलं आहे.

उरी येथील हल्ल्याआधी व नंतर पाकिस्तानच्या विरोधात भारतानं मोठी आघाडी उघडली आहे. जगभर पसरत असलेल्या दहशतवादाचं पाकिस्तान हे केंद्र आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले काही आठवडे अनेक जागतिक मंचावरून सांगत आले आहेत. गोव्यात रविवारी संपलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत तर ‘पाकिस्तान ही दहशतवाद्यांची मायभूमी आहे’, असं त्यांनी म्हटलं. पंतप्रधानांच्या या प्रचाराच्या धडाक्यानं जग पाकिस्तानला वाळीत टाकण्याची सुरुवात झाली आहे, असं भारत सरकार सांगत आहे.

वस्तुस्थिती काय आहे?
जागतिक राजकारणात दहशतवादाचा मुद्दा हा कळीचा आहे, ही गोष्ट सर्व मोठी राष्ट्रेच नव्हे, तर अगदी छोटे देशही मान्य करतात. या बाबतीत सर्वांचंच एकमत आहे. अगदी पाकिस्तानही त्यात सहभागी आहे; कारण आम्हीही दहशतवादाशी मुकाबला करत आहोत, अशी पाकिस्तानची भूमिका आहे. मात्र, भारताच्या भूमिकेला जग पाठिंबा द्यायला तयार नाही. म्हणजेच एका अर्थानं पाकिस्तानला वाळीत टाकण्यास जग तयार नाही. प्याला अर्धा भरला आहे, असं जग म्हणत आहे. भारत सांगत आहे, प्याला अर्धा रिकामा आहे.

भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे, असं ‘सर्जिकल स्ट्राइक्स’बाबत अमेरिका म्हणत आहे. त्याच वेळेस पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास अमेरिकेनं स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकी संसदेतील काही खासदारांनी ‘एनजीओ’च्या मदतीनं हाती घेतलेल्या सह्यांची मोहीमही ओबामा प्रशासनानं थांबवली.

चीनच्या पश्चिम भागातील क्षिनजिआंग प्रांतात तुर्की वंशाच्या मुस्लिमांची मोठी वस्ती आहे. त्यांना स्वायत्तता हवी आहे. त्यावरून या प्रांतात सतत अशांतता असते. दहशतवादी हल्लेही होतात. ही सगळी अस्वस्थता व अशांतता चीन कठोरपणे मोडून काढत आला आहे. या प्रांतातील काही गटांचे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशीही संबंध आहेत. इतकं असूनही चीननं जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरला ‘दहशतवादी’ ठरवणारा युनोचा ठराव फेटाळण्यासाठी नकाराधिकार वापरला. कारण भारताच्या विरोधात पाकिस्तानला बळ देत राहणं, हे चीनचं गेल्या काही दशकांतील धोरण राहिलं आहे. गेल्या तीन- चार वर्षांत भारत-अमेरिका यांच्यात विविध विषयांवर सहमती होऊ लागल्यावर चीननं या धोरणाला आणखी धार देणं सुरू केलं आहे. मात्र, भारत हा आपला ‘निव्वळ मित्र’ नाही, तर तो ‘संरक्षण रणनीतीतील सहकारी’ आहे, असं अमेरिका म्हणत आहे. भारताच्या संरक्षणाच्या रणनीतीत दहशतवादाला तोंड देणं, हा कळीचा भाग आहे. भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे, असंही अमेरिका म्हणत आहे.

प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे?
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी हे काही आठवड्यांपूर्वी भारतात आले होते. भारताप्रमाणे आमच्या देशातही पाकिस्तान कसा दहशतवाद पसरवत आहे, हे त्यांनी जाहीरपणे सागितलं. याच घनी यांनी दोन आठवड्यांपूर्वी ‘हिज्ब-ए-इस्लामी’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या गुलबुद्दीन हिकमतयार याच्याशी चर्चा केली. तीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि नंतर त्याच्याशी करार केला. आता हा हिकमतयार अफगाण सरकारला पाठिंबा देणार आहे आणि कदाचित तो वा त्याच्या सहकाऱ्यांपैकी काही अश्रफ घनी यांच्या सरकारात सामीलही होतील. हा हिकमतयार सध्या पाकिस्तानमध्ये राहतो. त्याला युनोनं ‘दहशतवादी’ घोषित केलं आहे. ‘ह्युमन राइट्स वॉच’ या जागतिक स्तरावरच्या मानवी हक्क संघटनेनं हिकमतयार यांचं वर्णन ‘अत्यंत क्रूर व अनेक नरसंहारांत हात असलेला दहशतवादी’ असं केलं आहे. या हिकमतयार यांच्याशी करार केल्यावर घनी यांनी जाहीर केलं आहे की, ‘अफगाणिस्तानातील सत्तेत वाटा मिळण्याचा हा मार्ग आहे, हे तालिबानच्या सर्व गटांनी लक्षात घ्यावं. येत्या काही दिवसांत हिकमतयार याला दहशतवादी ठरवणारा युनोचा ठराव मागे घेतला जाणार आहे. मग हा हिकमतयार आपल्या ‘हिज्ब-ए-इस्लामी’ या संघटनेच्या इतर सशस्त्र दहशतवाद्यांसह काबुलला येणार आहे.

हा असा करार घडवून आणण्याची प्रेरणा व पुढाकार अमेरिकेचा होता. हिकमतयार याच्यावरील निर्बंध मागे घेण्यासाठी अमेरिकाच युनोत ठराव आणणार आहे.

अशा परिस्थितीत दिल्लीत येऊन पाकिस्तानवर ठपका ठेवणारे अफगाण अध्यक्ष घनी खरे की काबुलला परत गेल्यावर पाकिस्तानमध्ये असलेल्या हिकमतयार याच्याशी चर्चा करून त्याला सरकारात सामील करून घेण्यासाठी पावलं टाकणारे घनी खरे? भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे, भारत आमचा ‘संरक्षण रणनीतील सहकारी’ आहे, असं म्हणणारे ओबामा खरे की घनी यांनी हिकमतयार याच्याशी हातमिळवणी करावी, यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणारे ओबामा खरे?

दोन्हीही घनी आणि दोन्ही ओबामा खरेच आहेत; कारण आपल्या हिताला ते प्राधान्य देत आहेत. ‘त्यांचा’ दहशतवादी वाईट असतो; ‘आपला’ दहशतवादी चांगला असतो, अशी ही विभागणी आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला कोण व कशाला वाळीत टाकेल?

prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...