कंदाहार - तालिबानने दक्षिणेकडील हेलमंद प्रांताची राजधानी असलेल्या हेलमंद शहरात मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. शहरात एका आत्मघाती कार बॉम्बस्फोटात सोमवारी १४ जण ठार झाले असून, त्यात १० अफगाणी पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सध्या हेलमंद शहरात तैनात असलेले नाद अली जिल्ह्याचे पोलिस प्रमुख हाजी मारजान यांनी सांगितले की, तालिबानी दहशतवाद्यांनी आधी शहरातील अनेक नाक्यांवर हल्ले केले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात किमान १० पोलिस अधिकारी आणि ४ नागरिक असे १४ जण ठार झाले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली. लष्कर गाहमधील आंतरराष्ट्रीय आपत्कालीन रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, आतापर्यंत १४ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. १५ जखमींनाही रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यापैकी १४ जण बॉम्बस्फोटात जखमी झाले असून एकाला गोळी लागली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे गृहमंत्रालयाचे प्रवक्ता सेदिक सेदिक्की यांनी, तालिबानने लष्कर गाह येथे सुरक्षा दलांच्या चौक्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण सुरक्षा दले दहशतवाद्यांना लवकरच माघार घ्यायला भाग पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, लष्कर गाहमध्ये आमची आगेकूच सुरू आहे, असा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने सोमवारी केला.