अम्मन - येमेनमधील दोन आठवड्यांच्या संघर्षात किमान ७४ मुलांचा मृत्यू झाला. सुमारे १ लाखाहून जास्त लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केली आहे.
येमेनमधील हिंसाचारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपुर्या औषधसाठ्यामुळे अनेक रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करणे कठीण झाले आहे. रुग्णालयांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात तीन आरोग्य कर्मचार्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका रुग्णवाहिकेच्या चालकाचा समावेश आहे.
या संघर्षात मुलांना सर्वाधिक फटका बसल्याची माहिती युनिसेफचे येमेन प्रतिनिधी ज्युलियन हार्नेस यांनी दिली. येथील नागरिक, मुलांचे प्राण धोक्यात आले आहेत. त्यांचे शिक्षण आणि आरोग्य संकटात आल्याचे हार्नेस यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. सौदी अरेबियाने २६ मार्चपासून येमेनमधील शिया बंडखोरांवर केलेल्या हल्ल्यात ७४ मुलांचा मृत्यू झाला, तर ४४ जण जखमी झाले.