आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या विद्यापीठावर हल्ला, विद्यार्थ्यांसह 12 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अफगाणिस्तान या शैक्षणिक संस्थेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२ जण ठार, तर ३६ जण जखमी झाले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली तरी हल्ल्यामागे तालिबानच असल्याचा संशय आहे.

अफगाणिस्तानच्या गृह विभागाचे प्रवक्ता सेदिक सेदिक्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ७ विद्यार्थी, ३ पोलिस अधिकारी आणि २ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. जखमींमध्ये ९ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. त्या वेळी या विद्यापीठात शेकडो विद्यार्थी संध्याकाळच्या वर्गांना हजर असतात. आत्मघातकी बॉम्बहल्ला करणारी कार प्रवेशद्वारातून घुसली आणि त्यानंतर दोन दहशतवादी आत आले. त्यांच्याकडे ग्रेनेड आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रे होती. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांना पहाटे ३.३० वाजता ठार केल्यानंतर हे ओलिस नाट्य नऊ तासांनंतर संपुष्टात आले. सुमारे नऊ तास विद्यापीठात भयनाट्य सुरू होते. विद्यापीठातील विविध इमारतींत अडकलेल्या २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पोलिसांनी सुटका केली. हल्ल्यात एक परदेशी शिक्षकही जखमी झाला.
हे विद्यापीठ काबूल शहराच्या पश्चिमेला असून त्याची स्थापना २००६ मध्ये झाली आहे. अमेरिकन पद्धतीवर आधारित लिबरल आर्ट कोर्सेस तेथे शिकवले जातात. सध्या या विद्यापीठात १ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
बातम्या आणखी आहेत...