आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्यू की आता म्यानमारच्या अध्यक्षा होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपीताव - म्यानमारचे लष्करप्रमुख आणि आंग सान स्यू की यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चर्चेचे सकारात्मक फलित येण्याची शक्यता येथील सरकारी वाहिन्यांनी वर्तवली आहे. स्यू की राष्ट्राध्यक्षा होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

म्यानमारच्या राज्यघटनेनुसार परदेशी जोडीदार आणि अपत्ये असलेली व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र नाही. मात्र स्यू की यांच्या राजकीय पक्षाला मिळालेल्या घवघवीत जनमत कौलानंतर यात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. स्यू की यांचे पती ब्रिटिश होते. आता ते हयात नाहीत. ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पार्टीने बहुमत मिळवले. मात्र घटनेचे ५९ (फ) हे कलम त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदामधील प्रमुख अडथळा ठरत आहे. सध्या लष्करप्रमुख जनरल मीन आंग लियांग यांच्याशी हे कलम रद्द करण्यावर चर्चा सुरू आहे. यासाठी संसदेत ७५ % सहमती असणे अनिवार्य आहे. २५ % नियुक्त जागांवर लष्कराचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी स्वबळावर हा निर्णय घेऊ शकणार नाही.
दरम्यान स्यू की या पदावर येण्याच्या दिशेने सकारात्मक संकेत मिळत असल्याचे त्यांच्या पक्षाचे सदस्य क्याव हटवे यांनी दिले आहेत. मात्र राजकीय विश्लेषकांनी अद्याप अडचणी दूर झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

१७ मार्चपर्यंत निवड
३१ मार्च रोजी राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. १ एप्रिलपर्यंत पदाची सूत्रे नव्या अध्यक्षांनी घेणे अपेक्षित आहे. १७ मार्चपर्यंत राष्ट्राध्यक्ष, २ उपराष्ट्राध्यक्षांची निवड होणे अनिवार्य आहे. वरिष्ठ-कनिष्ठ सभागृह सदस्य आणि लष्करी प्रतिनिधी या ३ पदांसाठी मतदान करतात. सर्वाधिक मत मिळवणारी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होते. इतर दोघांना उपाध्यक्षपद दिले जाते.