आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ सप्टेंबरपूर्वी शांत झोपा, ट्रम्प यांचा हिलरींना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी हिलरींना ‘शांत झोपे’चा सल्ला दिला आहे. पुढच्या आठवड्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांचा पहिला वादविवादाचा सामना होणार आहे. दोन्ही उमेदवारांना परस्परांसमोर पाहण्यासाठी अमेरिकन जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन एकाही सार्वजनिक कार्यक्रमात वा प्रचार अभियानात सहभागी झाल्या नव्हत्या. निवडणुकांना दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. हिलरींनी एक दिवसाची रजा घेतली आहे काय, असा खोचक प्रश्न ७० वर्षीय ट्रम्प यांनी विचारला.

हिलरींनी संपूर्ण एक दिवस पुन्हा एकदा सुटी घेतली आहे, असे ट्रम्प म्हणाले. त्यांना सध्या आरामाची फार गरज आहे. ‘हिलरी तुम्ही शांत झोप घ्या,’ असा सल्ला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तुमची वादविवादाच्या दिवशी भेट होणार आहेच, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. आपल्या व्यग्र प्रचार वेळापत्रकातून हिलरींनी एक दिवस उसंत घेतल्याचे वृत्त येताच ट्रम्प यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी यापूर्वीही हिलरी क्लिंटन यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारले होते. त्यांच्या क्षमतेची खिल्लीही त्यांनी बऱ्याचदा जाहीर भाषणांत उडवली आहे. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर मात्र ट्रम्प यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. मात्र, ६८ वर्षीय हिलरी किती तास काम करू शकतील, अशी शंका त्यांनी वेळोवेळी उपस्थित केली आहे.
अभूतपूर्व प्रतिसादाचा अंदाज
२६ सप्टेंबरच्या भाषणांना विक्रमी प्रतिसाद मिळण्याचा अनुमान वर्तवण्यात आलाय. ९ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर रोजी पुढील दोन वादविवाद सत्र आयोजित करण्यात आले आहेत. उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार टीम केइन, माइक पेन्स यांची जाहीर भाषणे ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहेत.
२६ सप्टेंबर रोजी दोन्ही उमेदवार आमने-सामने
राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या वादविवाद सत्राला २६ सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प-क्लिंटन प्रथम समोरासमोर येतील. अशा प्रकारचे ३ सत्र आयोजित करण्याची प्रथा अमेरिकेत आहे. मतदानावर याचा मोठा प्रभाव पडतो. या तीन सत्रांतील उमेदवारांची भूमिका जनमानसावर मोठा प्रभाव टाकत असल्याचा इतिहास आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार या पहिल्या सामन्याला १०० दशलक्ष व्ह्यूवरशिप मिळेल.
बातम्या आणखी आहेत...