आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३७ पर्यटकांसाठी २ लाख जीव वाऱ्यावर, वास्तव कुणी जगासमोर आणलेही नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडूतून - दु:ख, वेदनेच्या खोऱ्यात शिरण्यापूर्वी मी आपणाशी दोन गोष्टी शेअर करू इच्छितो. एक म्हणजे संवेदना आणि दुसरी इशारा. भूकंपाच्या तडाख्यात ढिगाऱ्याखाली दबले गेलेले असंख्य लोक आणि त्यांचे आप्तस्वकीय यांच्याप्रति असणाऱ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो. भूकंपाला सात दिवस उलटले. भूकंपग्रस्त म्हणून ना त्यांचा उल्लेख झाला ना मृतांची ओळख. त्यांची छायाचित्रे आली नाहीत की त्यांच्याबाबत काही छापूनही आले नाही. मृतांच्या आकड्यांत तरी गणती होईल की नाही एवढी विदारक स्थिती आहे. त्यामुळे भूकंप बळींची संख्या १५ हजारांच्या वर जाऊ शकते.
दुसरे म्हणजे इशारा असा की, निसर्गाने मनात घेतल्यास नेपाळमधील मृत्यूचा आकडा वीस हजारांपर्यंत मर्यादित राहू शकतो. अन्यथा, दुप्पट वा त्यापेक्षा आणखी जास्त होऊ शकतो. माणसांच्या मूर्खपणाच्या ढिगाऱ्यातून काही वाचलेच तर तो एक चमत्कार समजावा. कारण येथील सरकार मख्ख बसून आहे. प्रशासन जेवढे काही दिसते ते फक्त काठमांडूत आहे.
आतापर्यंत जगासमोर न आलेली कहाणी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो. नेपाळमधील भूकंपानंतर सर्वकाही रुळावर आल्याचा समज काठमांडूकडे पाहून करून घेऊ नका. टीव्ही वाहिन्यांवर संकटात अडकलेले आणि सुखरूप बाहेर काढलेल्यांची संख्या ११ हजार लोकांची कथा वारंवार ऐकवली जाते. हेलिकॉप्टर व विमानांतून अन्नाची पाकिटे टाकल्याचे दाखवण्यात आले. हे खरे असले तरी ते अर्धसत्य आहे. वास्तव समाेर आल्यानंतर अनेक मुखवटे गळून पडतील.

पहिले सत्य म्हणजे नेपाळमध्ये सरकारी मदतकार्य भूकंपानंतर दोन दिवसांनंतर सुरू झाले. मग प्रश्न उरतो की सरकार दोन दिवस कुठे गायब होते? सरकारी मदत कार्यही व्हीआयपी आणि गरीब या भेदातून केले जाते याचा कोणी विचारही केला नसेल. शनिवारी भूकंप आला तेव्हा बडे सरकारी अधिकारी हेलिकॉप्टर आणि अन्य साधनसामग्री घेऊन २२ देशांच्या २३७ गिर्यारोहकांची देखभाल करण्यासाठी गेले होते. संपूर्ण ब्युरोक्रसी हॉटलाइनवर या देशांच्या दूतावासाला उत्तर देण्यात व्यग्र होती. दुसरीकडे नेपाळच्या १४ टक्के जिल्ह्यातील एकतृतीयांश लोकसंख्या म्हणजे दहा लाखांपेक्षा जास्त लोक मदतीसाठी आशेने वाट पाहत बसले होते.

शनिवारी भूकंप आला. या दिवशी नेपाळमध्ये साप्ताहिक सुटी असते. काही जिल्ह्यांचे मुख्य जिल्हाध्यक्ष(जिल्हाधिकारी किंवा त्या समकक्ष) सुटीवर होते. दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तर गृहमंत्री वामदेव गौतम यांच्या सांगण्यावरून दोन दिवसांनंतर आले. पंतप्रधान सुशीलकुमार कोईराला यांना इंडाेनेशिया दौऱ्याहून परतताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टि्वट वाचून देशात आलेल्या आपत्तीची माहिती मिळाली. गृहमंत्री वामदेव गौतम यांच्याकडे मदत व बचाव कार्याची जबाबदारी होती. त्यांनी ती व्यवस्थित हाताळली नाही. भूकंपग्रस्त १४ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यातच त्यांचा बहुतांश वेळ गेला. या दरम्यान दूरसंचार नेटवर्कही खंडित झाले. अकरा भूकंपप्रभावित जिल्हा मुख्यालयात सॅटेलाइट फोन होते, मात्र अधिकाऱ्यांना ते हाताळता येत नव्हते. संपर्क यंत्रणेत प्रशासन निष्फळ ठरले. एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची तयारीच नव्हती,अशी कबुली दूरसंचारमंत्री मानेंद्र रिजाल यांनी या वेळी दिली.

दुसरे सत्य काठमांडू मदत व बचाव कार्याचे केंद्र ठरले आहे. मात्र, भूकंपाचे सर्वाधिक नुकसान सिंधुपाल चौक, गोरखा, दोलखा, नवांकोट, रसुआ, भक्तपूर, हिमाली क्षेत्र,चारीकोट, ललितपूर, घादिंग, काव्यपंचागसह चौदा जिल्ह्यांत झाले. यातील दुर्दैव म्हणजे नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण ११ हजार लोक मृत्युमुखी पडले. त्यातील सात हजार या भागातील लोक आहेत. हा भाग दुर्गम क्षेत्रात आहे, असेही नाही. सर्व गावे काठमांडूपासून ६० किमीच्या व्यासात आहेत.

भूकंपाच्या आठवडाभरानंतरही या गावांत मदत पोहोचू शकली नाही हा निसर्गनिर्मित संकटापेक्षाही मोठा आघात आहे. या गावांत मदत छावण्या नाहीत. मदत सामग्री हेलिकॉप्टरमधून फेकली जाते. यात कुणाला मिळते कुणाला नाही. काही ठिकाणी भूकंपाच्या ढिगाऱ्याशी स्पर्धा करणारी अन्नाची पाकिटे, बिस्किटे, आैषधांचे ढिगारे दिसून येतात, तर काही ठिकाणांतून मदतीसाठी आक्रोश ऐकू येतो. वितरण व्यवस्थेत सुसूत्रता नसल्यामुळे लुटालूट बोकाळली आहे. या घटनेत आपले घर उद््ध्वस्त झालेले काँग्रेसचे प्रमुख नेते नवीन जोशी म्हणाले, भूकंपात घर नष्ट झाले, आता पावसात उरलेसुरलेही हातचे गेले आहे.

काठमांडूवर होणाऱ्या मदतीच्या वर्षावाचेही एक वास्तव आहे. वस्तुस्थिती अशी की लोकांची कनेक्टिव्हिटी येथून पुढे होऊ शकत नाही. लोक वेगवेगळ्या देशांतून विमानात बसून येथे येतात. काठमांडूला पाहून सर्वाधिक तडाखा बसलेला भाग अशी धारणा करून घेतात. त्यामुळे त्यांचे मदतकार्य येथे सुरू होते आणि येथेच संपते.

तिसऱ्या आणि सर्वात भयावह सत्याच्या शोधात भूकंपाच्या तडाख्याचे मुख्य केंद्र सिंधुपाल चौक, गोरखा आणि दालखा या भागाची स्थिती जाणून घेऊया. एकट्या सिंधुपालमध्ये २००० जणांचा मृत्यू झाला. मृतांची गणती आणखी चालूच आहे. गावात स्मशानशांतता आहे. सूर्य मावळतीला गेला आहे. गावात सायंकाळची छटा पसरली आहे. आज रात्रीही या आपत्तीतून बचावलेल्या लोकांना डोळा लागत नाही.

भूकंप आणि मृतदेहाच्या दुर्गंधीमुळेही त्यांना झोप लागत नाही. काठमांडूपासून जवळ असलेल्या या गावात सहा दिवसांनंतर मदत पथक पोहोचले. सरकारला
संपूर्ण भागातील लोक मृत झाल्याचे वाटले. मिळेल त्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीजपुरवठा गायब आहे. मृतदेहांचा भडाग्नीच
गावातील अंधार दूर करत आहे. जळणारे मृतदेहच पीडितांच्या डोळ्यातील अश्रू सुकवत आहेत. गोरखा, दोलखा आणि अन्य गावांतही िहच अवस्था आहे.
अखेरचे आणि हृदय पिळवटून टाकणारे सत्य काठमांडूच्या नॅशनल ट्रॉमा सेंटरचे आहे. साधारण ३०० खाटांच्या या रुग्णालयात १००० रुग्ण आहेत. दररोज ३०० ते ४०० नव्याने भरती होतात. ढिगाऱ्याखालून बचावलेले रुग्ण आता डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे देहत्याग करत आहेत. औषधांची मदत पाेहोचली, मात्र ती कशी द्यायची हे कुणालाच कळत नाही. येथे जवळपास १०० रुग्णांमागे एक डॉक्टर आहे. डोक्याला दुखापत झालेले शेकडो रुग्ण आहेत. भूकंपात सहा महिन्यांपासून तेरा वर्षांच्या मुलापर्यंत जखमी झाले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी केवळ तीन
बालराेगतज्ज्ञ अाहेत. भूकंपात केवळ दोन मिनिटे पृथ्वी हादरली, मात्र निष्काळजीपणा आणि अव्यवस्थेमुळे येथील ट्राॅमा सेंटर रोज थरथरते आहे. गोमघू गावातील चुलतभावाचे प्राण वाचवणाऱ्या नारायणपतीची विनवणी ऐकून कुणाचेही मन सुन्न होईल. ते म्हणाले, डॉक्टर साहेब... त्याच्या घरातील कुणीच वाचले नाही. तुम्ही वाचवत असाल तर त्याचे हात वाचवा...

अखेरचे सत्य, नेपाळच्या राष्ट्रीय ओळखीशी संबंधित: काही गोष्टी शहर आणि देशाला ओळख देतात. नेपाळची ओळख आधीची राजधानी भक्तपूर, जागतिक वारसा बसंतपूर आणि धरहरा टॉवर. मात्र, दुर्दैव पाहा, सध्या हा वारसा जमीनदोस्त झाला आहे. विचार करा, दिल्लीचा कुतुबमिनार, लाल किल्ला किंवा आग्ऱ्याचा ताज नसेल तर आपले किती नुकसान होईल. भूकंपाच्या वेदनांचा अंत नाही. भूकंपातून हिमालयाचा आराखडा हलला. भक्तपूरहून काठमांडूकडे येताना एक माता ढिगाऱ्यात काहीतरी शोधत होती. तिला एक खेळणे सापडले. खेळणे सुरक्षित निघाली, मात्र ते खेळणाऱ्या एकुलत्या एक मुलाने प्राण गमावले. काय करणार, या मातेच्या वेदनेचे मोजमाप करणारी कुठली आलीय रिश्टर स्केल?

पुढील स्लाइडवर वाचा, भास्करचे नेपाळच्या पंतप्रधानांना तीन प्रश्न