आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राऊनचा आज ३७ वा वाढदिवस,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर मातृसुखाचे हसू फुलवणारे आयव्हीएफ हे चमत्कारिक तंत्रज्ञान आहे. २५ जुलै हा दिवस हे तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्रासाठीही खासच आहे. आजच्या दिवशी १९७८ मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राऊनचा जन्म झाला होता.

मँचेस्टरच्या ओल्डहॅम जनरल हॉस्पिटलमध्ये जन्मलेली लुईस ३७ वर्षांची होत आहे. तिने पहिल्यांदाच तिच्या बालपणीची चित्तरकथा व सोसलेलेे अनुभव कथन केले आहेत. ‘मी जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहे हे ऐकायला किती बरे वाटते! त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पण त्यामागे आधी माझे आई-वडील व नंतर माझ्या वाट्याला आलेले अनेक कटू क्षणही आहेत. वैद्यकशास्त्र व मीडियासाठी मी एक चमत्कार आणि सेलिब्रिटी ठरले तरी मूलतत्त्ववादी आणि परंपरावाद्यांसाठी तर मी ‘राक्षसाचे अपत्य’च होते.ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली, टुकूमुकू पाहणारी मी एक मुलगी होते. परंतु अनेक लोक मला प्रयोगशाळेत जन्मलेल्या उंदरासारखेच मानत.’
आमच्या घरी जगभरातून पत्रे यायची. काही प्रेमाने भारलेली तर तर काही माझ्याविषयी अत्यंत गलिच्छ भावना व्यक्त करणारी! तीन महिन्यांची असताना कुणीतरी माझ्या नावे एक पार्सल पाठवले. गिफ्ट असेल असे आईला वाटले. उघडले तर आतमध्ये लाल भडक रंगाचे एक पत्र होते. त्यात ‘टेस्ट ट्यूब बेबी वॉरंटी कार्ड’असे लिहिले होते. सोबत दोन फुटलेल्या ट्यूब व प्लास्टिकचे दोन भ्रूण होते. माझ्या आईसाठी ते सर्वात दु:खद क्षण असतील. मी थोडी मोठी झाले तरी अडचणी संपल्या नाहीत. लोक मला विचित्र नजरेने पाहत. स्वत:ला एक सामान्य मुलगी, सामान्य माणूस म्हणून सिद्ध करण्यातच माझ्या जीवनातील बराच काळ निघून गेला.’ लुईसने जीवनातील अशाच अनुभवांवर पुस्तक लिहिले आहे.

एक जीव म्हणून लुईसने आकार घेतला त्या जारसह लुईस ब्राऊन. डावीकडे आई-वडिलांसह टकमक डोळे मिचकावताना तहानुली लुईस