इस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गृहमंत्री तथा रिटायर्ड कर्नल शुजा खानजादा यांच्या कार्यालयाबाहेर आज (रविवार) आत्मघातकी स्फोट झाला. यात शुजा खानजादा आणि डेपुटी सुपरिटेंडंट ऑफ पोलिस हजरो सैय्यद शौकत शाह यांच्यासह आठ जण ठार झालेत. ही घटना अटक शहराजवळ असलेल्या शादी खान गावात घडली.
'डॉन'च्या वृत्तानुसार, खानजादा यांच्या कार्यालयात जिरगाचे (स्थानिक आणि धार्मिक नेत्यांची बैठक) आयोजन केले गेले होते. त्यासाठी 100 च्या जवळपास लोक आले होते. पण, काही कळायच्या आत कार्यालयाबाहेर स्फोट झाला. स्फोटामुळे ऑफिसचे छत कोसळले. यात ढिगा-याखाली 25 पेक्षा अधिक व्यक्ती दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय परिसरातील इमारतींच्या तावदानांनाही तडे गेलेत. केंद्रीय गृहमंत्री चौधरी निसार यांनी जखमींच्या मदतीसाठी तत्काळ एक हेलिकॉप्टर पाठवले. दरम्यान, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला.
लष्कर-ए-झांगवीने स्वीकारली जबाबदारी
या स्फोटाची जबाबदारी लष्कर-ए-झांगवी या संघटनेने स्वीकारली असून, या संघटनेचा प्रमुखाच्या मृत्यूनंतर खानजादा यांना वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही 'डॉन'ने म्हटले.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो..