आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूक रिंगणात भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या लुसियानाचे गव्हर्नर आणि भारतीय वंशाचे नेते बॉबी जिंदाल यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. पक्षांतर्गत रिपब्लिक प्रेसिडेंशियल नॉमिनेशनसाठी त्यांनी कॅम्पेनही लाँच केले आहे.
रिपब्लिकन पार्टीचे नेते असलेले जिंदाल यांच्यासमोर ख्रिश्चन मतांना अाकर्षित करण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. दोन वेळा गव्हर्नर राहिलेले 44 वर्षीय जिंदाल यांच्यासमोर पक्षाचे फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबियो, फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बूश यांचे आव्हान असेल. विशेष म्हणजे जेब बूश अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे भाऊ आहेत. जिंदाल पंजाबच्या एका हिंदु कुटुंबातील असून त्यांचे आई वडील जालंधरहून लुसियानाला स्थलांतरीत झाले होते.

कमी वयात मोठा राजकीय अनुभव
ऑक्सफर्डमध्ये शिकलेले जिंदाल यांनी कमी वयातच राजकारणात प्रवेश केला होता. वयाच्या 24 व्या वर्षीच ते हेल्थ सेक्रेटरी म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर 32 व्या वर्षी काँग्रेसची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर चार वर्षांनी लुसियाना राज्याचे गव्हर्नर बनले. जर मी उमेदवार बनलो तर माझ्या जिंकण्याची शक्यता आहे, असे नुकतेच जिंदाल पत्रकारांना म्हटले होते.

पीयूषचे बनले बॉबी, ख्रिश्चन धर्म स्वीकारला
बॉबी जिंदाल यांचे खरे नाव पीयूष जिंदाल आहे. त्यांचा जन्म बॅटन रूज, लुइसियाना येथे एका अनिवासी भारतीय पंजाबी कुटुंबात झाला होता. 1970 मध्ये त्यांचे वडीला भारतातील गाव खानपुरा सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार जिंदाल यांनी बॉबी हे नाव ब्रॅडी बंच या टिव्ही शोमधील पात्र बॉबी ब्रॅडीच्या नावावरून चौथ्या वर्षी धारण केले होते. कायदेशीररित्या त्यांचे नाव पीयूष जिंदाल आहे. 1996 मध्ये त्यांनी सुप्रिया जॉली यांच्याशी विवाह केला होता. त्या दोघांची तीन मुले आहेत. सेलिया एलिझाबेथ, रॉबर्ट शान आणि स्लेड रयान. जन्माने हिंदु असलेले जिंदाल यांनी हायस्कूलमध्ये असताना ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. धर्मांतरानंतर त्यांची भारतीय धर्म आणि भारताबाबतची आस्थाही बदलली.

स्वतःला भारतीय मानतच नाही
आपण स्वतःला भारतीय मानतच नाही असे वक्तव्य करत नुकताच जिंदाल यांनी सर्व भारतीयांना धक्का दिला होता. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय व्यक्तींना निष्ठेचा धडा देत स्वतःला भारतीय-अमेरिकन म्हणणे बंद करण्याचा सल्लाही दिला होता. त्यांना स्वतःलाही तसे म्हणणे आवडत नाही. आपले आई वडील अमेरिकेत अमेरिकन बनायला आले होते भारतीय-अमेरिकन नाही, असे ते म्हणतात. आम्हाला भारतीय बनायचे असते तर आम्ही भारतातच राहिलो असतो असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...