आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • California Court Rules Yoga In Schools Does Not Violate Children\'s Religious Rights.

योगाचा हिंदुत्व अथवा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, कोर्टाचा निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - शाळेत योग वर्ग घेतल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत नसल्याचे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांताच्या अपिलीय न्यायालयाने म्हटले आहे. योगाचा हिंदुत्व अथवा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. काही संदर्भांमध्ये योग धार्मिक होऊ शकतो, परंतु शाळेमध्ये त्याचे प्रशिक्षण देण्याचा धर्माशी काहीएक संबंध नसल्याचे तीन न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
कॅलिफोर्नियातील शाळांमध्ये एक बिगर व्यावसायिक संस्था आठवड्यातून दोन दिवस अष्टांग योगाचे वर्ग घेते. त्यात ५६०० विद्यार्थी असतात. दणकटपणा, उत्साह आणि संतुलन वाढवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पद्धतीने या विद्यार्थांना योग शिकवला जातो, असे त्यांचे मत आहे.
सध्या संपूर्ण देशात अनेक शाळांमधून योग शिकवला जातो. शाळेतील अध्ययन संपल्यानंतर योग वर्ग घेतले जातात, असे ही संस्था आणि शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो अपील्स न्यायालयातील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले की, काही संदर्भात योग धार्मिक असू शकतो परंतु योग कार्यक्रमांत धार्मिक आणि अध्यात्मिक बाबी असतात हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत. योग ही ५००० वर्षे जुनी भारतीय शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक प्रक्रिया आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणे हा तिचा उद्देश आहे. न्यायालयाने योग वर्गाचे व्हिडीओही पाहिले आणि परंपरागत व्यायाम वर्गाला हा पर्याय असल्याचे म्हटले. हा कार्यक्रम धर्मनिरपेक्ष असून त्यातून कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नसल्याचे शिक्कामोर्तब न्यायालयाने केले.
योगातून हिंदू धर्माला प्रोत्साहन : पालक
योग हिंदुत्वाशी संबंधित असून त्यामुळे आमच्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे सांगत इन्सिनिटास डिस्ट्रिक्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी योग वर्गाला आव्हान दिले होते योग वर्गातून हिंदू धर्माला प्रोत्साहन मिळत असून त्यामुळे ख्रिश्चन धर्माला धोका निर्माण होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.