ओटावा - कॅनडात ३३८ संसदीय जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. गेल्या दहा वर्षांपासून काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते स्टीफन हार्पर सत्तेत आहेत. त्यांचे स्थान अबाधित राहते वा लिबरल पार्टी पुन्हा सत्तेवर येते, ही सर्वात मोठी उत्कंठा या निवडणुकीत आहे. सद्य:स्थितीत लिबरल नेते जस्टिन त्रुदोंनी हार्पर यांना मागे सारल्याचे चित्र आहे.
जस्टिन यांचे वडील पियरे त्रुदो १९६८ ते १९८४ दरम्यान १६ वर्षे कॅनडाच्या पंतप्रधानपदी होते. कॅनडाच्या संसदीय निवडणुकीत या वेळी ४८ भारतवंशीय निवडणूक रींगणात आपले भाग्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकांत ८ भारतवंशीयांना निवडणुकीत यश मिळाले होते. कॅनडाच्या जनतेला अधिक अधिकार देणे व अनिवासींविषयीचे नियम व्यापक करणारे नेते म्हणून पियरे त्रुदोंची ख्याती आहे. त्रुदोंचा वारसा हार्पर यांनी खंडित केला होता. चौथ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हार्पर यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. त्यांना यशस्वी होण्याबद्दल विश्वास आहे. जस्टिन त्रुंदो केवळ ४३ वर्षांचे आहेत. काँझर्व्हेटिव्हचा बालेकिल्ला असलेल्या अल्बर्टा येथे त्यांनी सभा घेतली. कॅनडात खऱ्या अर्थाने बदल करण्यासाठी व हार्पर दशक संपुष्टात आणण्याचा नारा त्यांनी दिला आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी विरोधकांच्या पारंपरिक सत्ता असलेल्या मतदारसंघांना भेटी दिल्या. यंदा या ठिकाणी लिबरल पार्टी जागा जिंकेल असा विश्वास त्रुंदोंना आहे. ५६ वर्षीय हार्पर यांनी मुस्लिम नकाब विरोधी आंदोलन चालविले.