आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिलीत आपत्ती: पुरामुळे नद्यांचे पाणी विषारी, 40 लाख लोक तहानलेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सँटियागो - चिली या लॅटिन अमेरिकी देशाची राजधानी असलेल्या सँटियागो शहराजवळ ४० लाख लोक नद्यांना आलेल्या पुरामुळे तहानलेले आहेत. रविवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी) त्यांच्या घरातील पाणीपुरवठा तोडण्यात आला. अनेक घरांत पुराच्या पाण्यासह चिखलही वाहून आला आहे. पूल तुटल्याने सुमारे ४०० लोक पर्वतीय भागांत अडकले आहेत. सँटियागो हे सुंदर शहर अँडीजच्या बर्फाच्छादित खोऱ्यात समुद्र सपाटीपासून सुमारे १७०० फूट उंचीवर वसलेले आहे.  
 
सुमारे ६१ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरातील हॉटेल, रेस्तराँ आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाजार बंद आहे. जे लोक पूरग्रस्त भागांपासून दूर होते तेही नळाद्वारे पाणीपुरवठा न झाल्याने आश्चर्यचकित झाले. प्रशासनाने प्रमुख नद्यांतून होणारा पाणीपुरवठा खंडित केला आहे. पूर आणि पर्वतातून वाहून आलेल्या मातीमुळे पाणी विषारी झाले असून ते पिण्यालायक नसावे, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे.  
 
सँटियागोच्या दक्षिणेकडील ओहिगिन्स भागात अचानक जमीन खचल्याने एक कार वाहून गेली. या कारमधून १२ वर्षीय मुलगी कुटुंबासह जात होती. काजो डेल मापियोत दोन जण वाहून गेले. तेथे ४०० पेक्षा जास्त लोक अडकले असून त्यांना बाहेर काढले जात आहे. पर्वतीय भागात स्थिती अत्यंत वाईट आहे, अशी माहिती राज्यपाल क्लॉडियो ओरेगा यांनी दिली.  
 
या भागात अनेक महिन्यांपासून दुष्काळ पडला होता. त्यामुळे आजूबाजूच्या जंगलांत आग लागली होती. अनेक आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर ती विझविण्यात यश मिळाले होते. या आगीत अनेक वन्यप्राण्यांचा बळी गेला होता.  

आपत्कालीन पथके पाणीपुरवठा सुरू करण्याच्या आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेत गुंतली आहेत. त्यात लवकरच यश येईल.  
- मिशेल बॅशलेट, चिलीच्या राष्ट्राध्यक्षा  
 
बातम्या आणखी आहेत...