आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिकेत बदल : ‘ब्रिक्स’नंतर चीनने केले घूमजाव; मित्र पाकिस्तानचा केला बचाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘दहशतवादाची जन्मभूमी’ असे संबोधल्यानंतर एक दिवसातच चीनने घूमजाव केले आहे. चीनने सोमवारी आपला जुना मित्र पाकिस्तानचा बचाव करताना म्हटले की, ‘तुम्ही कुठलाही देश किंवा धर्म यांना दहशतवादी म्हणू शकत नाही. जगाने पाकिस्तानचे बलिदानही स्वीकारायला हवे.’

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी हे उत्तर दिले. ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या उल्लेखाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. हुआ म्हणाल्या की, कोणत्याही देशाचा संबंध दहशतवादाशी जोडण्यास चीनचा विरोध आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही चीनचे शेजारी आहेत. दोघेही शांतता आणि चर्चा याद्वारे मतभेद दूर करू शकतात यावर आमचा विश्वास आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांत सुधारणा व्हावी, त्यातच दोन्ही देश आणि संपूर्ण विभागाचे भले आहे.
लष्कर, जैशला दहशतवादी घोषित करण्यावर सहमती नाही
ब्रिक्स शिखर परिषदेनंतर सचिव अमर सिन्हा यांनी म्हटले की, घोषणापत्रात विचारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यांसारख्या दहशतवादी गटांना दहशतवादी जाहीर करण्याबाबत सहमती होऊ शकली नाही. कारण हा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे, असे बहुतांश सदस्यांनी मान्य केले. त्यामुळे घोषणापत्रात इसिस, अल कायदा आणि जुबाहात-उल-नुसरा यांचा दहशतवादी संघटना असा उल्लेख आहे.
पाकिस्तानची प्रशंसा
चीनच्या प्रवक्त्या म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश दहशतवादाने ग्रस्त आहेत. पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी मोठे बलिदान दिले आहे. त्याला मान्यता मिळावी. पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि पैसा उपलब्ध करून देत आहे, दहशतवाद्यांना सीमेपलीकडे भारतात पाठवून हल्ले करत आहे, याकडे लक्ष वेधले असता चुनयिंग म्हणाल्या की, मला तुमची चिंता समजते; पण चीनची याबाबतची भूमिका स्थिर आहे.
मोदींनी म्हटले होते, दहशतवादाची जन्मभूमी
गोव्यातील ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दहशतवादाची जन्मभूमी असे संबोधले होते. त्या वेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हेही उपस्थित होते. जिनपिंग यांनी त्यावर कुठलीही टिप्पणी केली नव्हती, पण दहशतवादाला मात्र विरोध केला होता. परिषदेनंतर जारी केलेल्या संयुक्त घोषणापत्रातही दहशतवादाच्या विरोधात संयुक्त लढा देण्याचा संकल्प करण्यात आला होता.
दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात कडक कारवाई हवी, बिम्सटेकच्या घोषणापत्रातील भूमिका
मोबोर (गोवा) | दहशतवादी गटांना प्रोत्साहन, पाठिंबा आणि अर्थसाहाय्य करणाऱ्या देशांच्या विरोधात कडक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन ‘बिम्स्टेक’ देशांच्या गटाने केले आहे. बिम्स्टेकने असे आवाहन केल्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला वेगळे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ या देशांची ‘बिम्स्टेक’ ही संघटना आहे. या देशांच्या नेत्यांची रविवारी रात्री प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रात दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानी याला ‘शहीद’ संबोधले होते. त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना या संघटनेने, ‘शहीद’ संबोधून दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्याची गरज नाही, अशा शब्दांत शरीफ यांनाही फटकारले आहे. घोषणापत्रात म्हटले आहे की, दहशतवादाविरोधातील लढाई म्हणजे फक्त दहशतवादी गट आणि त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे नव्हे, तर जे देश दहशतवादाला पाठिंबा देत आहेत, आहेत त्यांनाही शिक्षा व्हावी.
बातम्या आणखी आहेत...