आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची गरज नाही; चीनची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादात तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, तसेच जेथे या दोन्ही देशात वाद आहे त्या भागात इतर देशांनी गुंतवणूक करण्यास आपला विरोध आहे, असे चीनने स्पष्ट केले आहे.

ईशान्य भारतात गुंतवणूक करण्याच्या जपानच्या योजनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, भारताशी जेथे आमचा वाद आहे त्या भागात परदेशी गुंतवणुकीस आमचा विरोध आहे. अरुणाचल प्रदेशचा थेट उल्लेख न करता हुआ म्हणाल्या की, भारताच्या ईशान्य भागात आमची आणि भारताची सीमा निश्चित झालेली नाही. दोन्ही देशांना स्वीकारार्ह राहील, असा तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ही बाजू तिसऱ्या पक्षाने समजून घ्यायला हवी. वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची कुठलीही गरज नाही.

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारत आणि जपान यांनी प्रसिद्धीला दिलेल्या संयुक्त निवेदनात चीनचा कुठलाही उल्लेख नाही, असे स्पष्ट करून हुआ म्हणाल्या की, आम्ही अॅबे यांच्या भारत दौऱ्याचा अभ्यास करत आहोत. संयुक्त निवेदनात दक्षिण चीन समुद्राचा समावेश असलेल्या भारत-पॅसिफिक भागाचा उल्लेख आहे. त्यात संबंधित देशांनी वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्यावर भर देण्यात आला आहे. जपानचा अप्रत्यक्ष उल्लेख करून हुआ यांनी सांगितले की, विविध महासागरांवरून विमानांचे उड्डाण करण्याचा अधिकार सर्वच देशांना आहे हे लक्षात घ्यायला हवे.
 
चीन आणि जपान यांच्यात पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून चांगलाच वाद आहे. जपान या भागाला सेंकाकुस म्हणतो, तर चीन त्याचा उल्लेख दिआओयू असा करतो. या बेटांभोवती दोन्ही देशांची जहाजं डोळ्यात तेल घालून गस्त घालतात.
 
 
भारत-जपान संबंध शांतता, स्थैर्यासाठी पूरकच
दळणवळण प्रकल्प आणि चीनच्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पावरील टीकेबद्दलच्या प्रश्नावर हुआ म्हणाल्या की, त्यात आक्षेपार्ह असे काही नाही. मला तरी तसे आढळले नाही. भारत आणि जपान हे दोघेही आशियातील महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील नजीकचे संबंध विभागीय शांतता आणि स्थैर्य यासाठी पूरकच ठरतील,अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...