आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारामुळे सीपीईसी निधी चीनने रोखला; पाकमधील रस्ते निर्माण ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील रस्ते बांधणीच्या महत्त्वाच्या तीन प्रकल्पांचे काम तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. चीन सरकारने यासंंबंधी आदेश दिले असून येथे आर्थिक अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्पाअंतर्गत (सीपीईसी) चीनने संरचनात्मक विकासासाठी ५० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे मंजूर केले आहे. इस्लामाबादेतील सीपीईसी कार्यालयातून प्रकल्प थांबवण्याचा आदेश निघाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.  


पाकिस्तान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने पाकिस्तानमध्ये रस्ते बांधणीसाठी १ खर्व रुपयांची गुंतवणूक चीनने केली आहे. मात्र, भ्रष्टाचाराच्या संशयामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच ३ मोठे प्रकल्प स्थगित केले असल्याचे वृत्त आघाडीच्या माध्यमांनी दिले. बीजिंग प्रशासनाच्या दिशानिर्देशानंतरच यापुढे निधी वर्ग केला जाईल.  


पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा रस्ता चीनच्या शिजियांग प्रांताला जोडला जात आहे. बलुचिस्तानपर्यंत हा रस्ता असून ही सर्वात प्रमुख परियोजना आहे. २१० किमीचा डेरा इस्माईल खान-झोब रस्ता, ११० किमी खुझदार -बास्मिया रस्ता हे प्रकल्प तूर्तास स्थगित केले. 

 

माध्यमांनी केला भंडाफोड 
सहाव्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीनंतर या प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. २० नोव्हेंबरपर्यंत यासाठी निधी वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, बीजिंग प्रशासन नवे दिशानिर्देश तयार करत असल्याचे कळवण्यात आले आहे. विविध ६ समित्यांनी या प्रकल्पांची पाहणी करून मंजुरी दिली होती, असे पाक अधिकाऱ्यांनी सांगितले. सीपीईसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या पाकिस्तानच्या माध्यमांनी दिल्यामुळे आता चीन सरकारने सावध धोरण अवलंबल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...