आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर चीन हतबल: पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध दाखवली एकजूट; जाहीरनाम्यात जैश, ‘ताेयबा’ची नावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शियामेन (चीन)- पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध सोमवारी ब्रिक्स परिषदेत भारताला मोठे यश मिळाले. चीनच्या कुरबुरीनंतरही ब्रिक्स जाहीरनाम्यात लष्कर-ए-तोयबा व जैश-ए- मोहंमद सारख्या  पाकस्थित ४ अतिरेकी संघटनांपासून धोका असल्याचे सांगितले. त्यात १० संघटनांचा उल्लेख आहे. ब्रिक्सची अशी पहिलीच यादी आहे. अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला. दहशतवादाच्या मुद्द्यावर एकटे पडू नये या भीतीतून चीनचा मित्र पाकिस्तानविरुद्ध उभे राहण्याचा नाईलाज झाला. जाहीरनाम्यात १७ ठिकाणच्या दहशतवादाचा उल्लेख झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले, शांतता व विकासासाठी ब्रिक्स देशांचे परस्पर सहकार्य हवे. मात्र, त्यांनी पाक पुरस्कृत दहशतवादाचा थेट उल्लेख केला नाही.

चीन म्हणाला-  हिंसाचारामुळे जैश, ‘ताेयबा’ची नावे जाहीरनाम्यात
चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याने सांगितले,  जैश-ए- मोहंमद व ‘ताेयबा’च्या हिंसाचारामुळे त्यांची नावे जाहीरनाम्यात समाविष्ट केली. ब्रिक्स देशांनी या संघटनांच्या हिंसाचाराविराेधात चिंता व्यक्त केली अाहे.

...मात्र मसूदबाबतचे धाेरण बदलले नाही
जाहीरनाम्यात दहशतवादाचा कठाेर शब्दात निषेध केल्यानंतरही ‘जैश’चा म्हाेरक्या मसूद अझहरला अांतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याबाबत चीनची अडेलतट्टू भूमिका कायम अाहे. दहशतवादविराेधी अामची भूमिका अाजही कायम असल्याचे चीनच्या प्रवक्त्याने सांगितले असले तरी संयुक्त राष्ट्रात मसूदविराेधात दाखल प्रस्तावावर दाेन वर्षांपासून हटवादी भूमिकेबाबत मात्र प्रवक्त्याने माैन बाळगले.

भारताने दहशतवादाचा मुद्दा उचलू नये, अशी चीनची इच्छा, मात्र मनसुबे उधळले
भारताने ब्रिक्सच्या या मंचावर पाकिस्तानविरुद्ध दहशतवादाचा मुद्दा मांडू नये, अशी चीनची इच्छा होती. परिषदेपूर्वी चीन परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला होता की, पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी मुद्द्यांवर भारताच्या समस्या असतात. मात्र, ब्रिक्सच्या मंचावरून उपस्थित करावयाचा हा विषय नाही. 

या कारणांमुळे हे यश मोठे...
गतवर्षी उरी हल्ल्यानंतर गोव्यातील ब्रिक्स परिषदेत चीनने पाकस्थित अतिरेकी संघटनांचा जाहीरनाम्यात समावेश करू दिला नव्हता. आता चीनमध्ये परिषद होत असताना भारताने त्यांची नावे घेण्यात यश मिळवले आहे.

या १० अतिरेकी संघटनांचा समावेश
शियामेन जाहीरनाम्यात तालिबान, आयएसआयएस, अल कैदा, इस्टर्न तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट, इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, हक्कानी नेटवर्क, जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तोयबा, तहरिक ए तालिबान पाकिस्तान आणि हिज्ब उत तहरीरकडून या क्षेत्रात पसरवल्या जाणाऱ्या हिंसाचारावर काळजी व्यक्त करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...