आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिगारेट पिणा-यांचे मूल दत्तक, आई-वडिलांच्या व्यसनाचा फटका बसू नये म्हणून कोर्टाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेल (ईस्ट यॉर्कशायर) - दोन वर्षांचा मुलगा सामान्यपणे श्वास घेऊ शकत नव्हता. आई-वडिलांना त्याची जराही पर्वा नसायची. ते दिवसरात्र सिगारेटची तल्लफ भागवण्यात मग्न होते. थोडे नव्हे, संपूर्ण घर सिगारेटच्या धुराने भरून जाई. या बाळाला वाचवण्यासाठी देव होऊन आल्या ज्युलियन एलन. त्या दहा वर्षांपासून लंडनमध्ये हेल्थ व्हिजिटरच्या रूपाने कार्यरत आहेत.

काही दिवसांपूर्वी त्या यॉर्कशायर येथील आपल्या परिचिताच्या भेटीला आल्या होत्या. त्याच वेळी त्यांची नजर शेजारी असलेल्या एका घरावर पडली. त्या घराच्या दाराखिडकीतून भयंकर धूर येत होता. त्या घरात गेल्या तेव्हा त्यांना सर्वत्र धूरच धूर दिसत होता. बाळाला सोफ्यावर टाकण्यात आले होते. त्याला नीटपणे श्वासही घेत येत नव्हता. हे पाहिल्यानंतर त्यांनी आई-वडिलांना चांगलेच फटकारले आणि बाळाला उचलून घेऊन आल्या. त्यानंतर स्थानिक कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली. ईस्ट यॉर्कशायरच्या एका कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. माझ्या दहा वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी असे घर पाहिले नव्हते. सिगारेटचा एवढा धूर एखाद्या घरात पाहण्याची माझी पहिलीच वेळ होती. धुराचे प्रमाण खूप अधिक होते. त्यात माझा श्वास गुदमरत होता. तुमच्या वागण्यामुळे मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय, हे ठाऊक आहे का? असे त्यांना विचारले. परंतु त्या आई-वडिलांनी काहीच उत्तर दिले नाही. ते दोघेही गप्प होते, असे एलन यांनी कोर्टासमोर सांगितले.

एलन घरात गेल्या तेव्हा त्यांना बाळ सोफ्यावर असल्याचे दिसले. घरात धुराचे लोट होते. ते बाळ झोपलेले होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. त्याचे कपडे आणि खेळण्यातूनही सिगारेटच्या धुराचा वास येत होता. मुलाचे वडील मानसिक रुग्ण असून ते कोकेनची नशा करतात, असे सांगण्यात आल्याचे कोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केले. परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. त्यामुळे मला एक कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. या छोट्या बाळाला त्याच्या आई-वडिलांकडे ठेवणे हे त्याचा जीव धोक्यात घालण्यासारखे होईल. अशा स्थितीत बाळाला दत्तक देणे हाच एकमेव मार्ग उरतो. एलन यांनी आई-वडिलांसमोर याबाबत चिंता व्यक्त केली होती.