आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग बदलणारा ‘डिस्प्ले’ तयार, कृत्रिम प्रकाशस्रोताची गरज नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - तुम्ही सरडा पाहिला असेलच. तो कसा सातत्याने त्याच्या त्वचेचा रंग बदलतो. असाच रंग बदलणारी त्वचा िकंवा शर्ट, साडी मिळाली तर... असे प्रत्येकाला वाटते. आता हे शक्य होणार आहे. भारतीय वंशाचे व सध्या अमेरिकेतील सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसर देबाशिष चंदा यांनी असा रंगीत, लवचिक त्वचेप्रमाणे डिस्प्ले विकसित केला आहे. या संदर्भात चंदा यांनी सांगितले, एलसीडी, एलईडी या सारख्या मानवनिर्मित डिस्प्लेसाठी उर्जेची गरज लागते. हे डिस्प्ले कडक, ठिसूळ आणि अवजड असतात.

मोबाइलच्या डिस्प्लेसाठी ऊर्जा, फिल्टर आणि काचेच्या प्लेटसची आवश्यकता भासते. मात्र आम्ही विकसित केलेल्या डिस्प्लेसाठी या कशाचीही गरज भासत नाही. हा डिस्प्ले अत्यंत लवचिक व रंग परावर्तित गुणधर्माचा आहे.

निसर्गातून प्रेरणा
प्रो. चंदा यांनी सांगितले, सरडा, ऑक्टोपस व स्क्विड (समुद्रात आढळणारा प्राणी) या प्राण्यात जन्मत:च लवचिक, अतिपातळ, रंग बदलणारी त्वचा असते. या रंगाच्या परावर्तनासाठी कृत्रिम प्रकाशाची गरज नसते. त्याच प्रमाणे नव्याने विकसित करण्यात आलेला डिस्प्ले आहे. मानवी त्वचेची जाडी १०० मायक्रॉन असते. नव्या डिस्प्लेची जाडी यापेक्षा कमी आहे.

फायदे काय
- सध्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाइलचे डिस्प्ले पातळ दिसत असली तरी प्रचंड अवजड आहेत. त्या जागी हा नवा डिस्प्ले वापरता येईल. प्लास्टिक व कृत्रिम धागे यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
- कमी खर्चात हा डिस्प्ले तयार होत असल्याने याचा वापर झाल्यास इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नवी क्रांती येईल असा दावा प्रो.चंदा यांनी केला.

असा तयार केला डिस्प्ले
अंड्याच्या टरफलाप्रमाणे असलेल्या धातूच्या नॅनो संरचनेत एक पातळ क्रिस्टलच्या थराचे सँडविच केले. हा थर आजूबाजूच्या प्रकाश लहरी शोषून घेतो व त्या परावर्तीत करतो. द्रवरुप क्रिस्टल अणु आणि प्लाझमोन लहरी यांच्यात धातूच्या नॅनोसंरचनेबरोबर परस्पर क्रिया घडते. या ध्रुवीकरणातून पूर्ण रंगाचे प्रतिबिंब उमटते.
बातम्या आणखी आहेत...