आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cow Is A National Animal In Nepal, Make New Constitution

गाय राष्ट्रीय पशू; नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- जल्लोष, हिंसाचार आणि विरोध अशा वातावरणात रविवारी नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाली. त्यामुळे प्राचीन हिंदू राष्ट्र नेपाळ आता धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य झाले आहे. सनातन हिंदू धर्माच्या रक्षणाची जबाबदारी सरकारकडे देण्यात आली आहे. हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी गाय आता देशाची राष्ट्रीय पशू असेल.

राजेशाहीऐवजी नेपाळ आता संघीय गणराज्य असेल. राष्ट्रपती रामबन यादव यांनी संसद भवनात नवी राज्यघटना लागू झाल्याची घोषणा केली. संविधान सभेने नव्या राज्यघटनेला ८५ टक्के बहुमताने मंजुरी दिली आहे. नव्या राज्यघटनेची घोषणा होताच राजधानी काठमांडू तसेच इतर अनेक शहरांत लोकांनी राष्ट्रध्वज फडकावत जल्लोष केला. फटाके फोडण्यात आले तसेच मिरवणुकाही काढण्यात आल्या. दुसरीकडे भारताला लागून असलेल्या सीमा भागात हिंसाचार उसळला. बीरगंजमध्ये सीपीएन-यूएमएल संसद सदस्यांच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. मधेसी आणि थारू समुदाय नव्या राज्यघटनेला विरोध करत आहेत. काठमांडू आणि जवळच्या भागात काही ठिकाणी बॉम्बच्या धमक्यांमुळे गोंधळ उडाला होता. पण बॉम्ब आढळला नाही.

दृष्टिक्षेपात राज्यघटना
-नेपाळच्या राज्यघटनेत ३७ खंड, ३०४ आर्टिकल आणि सात अनुसूची आहेत.
-संसदेची दोन सभागृहे असतील. प्रतिनिधी सभा या कनिष्ठ सभागृहात ३७५, तर वरिष्ठ सभागृहात ६० सदस्य.
-देश सात प्रांतांचे संघराज्य असेल. नावे नंतर ठरतील. सर्व प्रांतांची सीमा भारताला लागून असेल.
-प्राचीन हिंदू धार्मिक परंपरांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची असेल.
-धर्मांतर बेकायदेशीर असेल.
-लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर यांना समान अधिकार.
-देवनागरीतील नेपाळी राष्ट्रभाषा असेल. उर्वरित सर्व भाषा, बोलीभाषांना समान दर्जा.