लंडन / अहमदाबाद - पर्जन्यमानाच्या वेळापत्रक बदलाने हिंदी महासागरात तापमानात वाढ झाली आहे. भारतातील भूजलाची पातळी यामुळे घटली आहे. आयआयटी गांधीनगरच्या संशोधकांनी याविषयी संशोधन केले. भारतातील शेती ही भूजलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडत असून याची तीव्रता उत्तर भारतात अधिक आहे. येथील पर्जन्याचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे.
उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर भारतात भूजलाची पातळी प्रचंड घटल्याचे नोंदवले आहे. अन्न आणि पेयजल सुरक्षेसाठी भूजलाची पातळी संतुलित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा पाण्याचा वापर नियोजित पद्धतीने केला तरच भविष्यात सिंचनासाठी पाणी मिळू शकेल, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधक प्रमुख विमल मिश्रा यांनी सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा आकडा पाहता भूजलाचा शाश्वत साठा ही पूर्वअट आहे. मान्सून आणि भूजलाची पातळी यांच्या प्रमाणात ताळेबंद मांडल्यास भूजलाचा साठा जपण्याची व पुनर्भरण आणि तत्सम प्रयत्नांसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे दिसून येते.गंगेच्या पात्रातील परिसरात पर्जन्यमानात कमालीची घट झाली असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
भूजल कायद्याची अंमलबजावणी ठरते पर्यावरणासाठी महत्त्वाची
पाण्याचा साठा, भूपृष्ठावर पडणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन करणे भूजल कायद्यानुसार अनिवार्य आहे. मात्र, उपशाच्या प्रमाणात त्याचे पुनर्भरण होत नाही. पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि आैद्योगिक वापरासाठी भूजलाचा उपसा होत आहे. त्याप्रमाणात साठा, पुनर्भरण होत नसल्याचे दिसून येते. हवामान बदलांमुळे भूजलचा साठा आटला अाहे. विहिरींची पातळीही कमी झाली असल्याचे पाहणीत दिसून आले. नेचर जीआेसायन्स या संशोधन पत्रिकेत हा अहवाल सादर झाला.
२००९ नंतर भूजल पातळीत झपाट्याने घट
१९५० पासूनच्या भूजल पातळीचा आढावा यात घेण्यात आला. १०-२० क्यूबिक किलोमीटरने दरवर्षी भूजलात घट होत असल्याचे यात दिसून आले. वर्ष २००९ नंतर तर हा घटीचा दर २४०-२६० क्यूबिक किलोमीटर्सपर्यंत वाढला.