आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल-जझिराच्या पत्रकाराला बर्लिन विमानतळावर अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन-अल - जझिराचे पत्रकार अहमद मन्सूर यांना बर्लिन पोलिसांनी अटक केल्याचे रविवारी उजेडात आले. इजिप्तने त्यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार जर्मनीने ही कारवाई केली आहे. अटकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मन्सूर यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बर्लिनहून कतारला जात असताना मन्सूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते विमानात जात असताना त्यांना पोलिसांनी अटक केली. इजिप्तच्या न्यायालयाने मन्सूर यांना एका छळ प्रकरणात १५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. परंतु अल-जझिरा वाहिनीने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मन्सूर यांच्याकडे ब्रिटन आणि इजिप्तचे नागरिकत्व आहे. मन्सूर वाहिनीच्या अरबी सेवेसाठी काम करतात. मन्सूर यांना लवकरात लवकर कोर्टासमोर हजर करण्याचा प्रयत्न आहे. इजिप्तकडून कायदेशीर सहकार्याची विनंती आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल, असे जर्मनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोमवारपर्यंत ताब्यात
मन्सूर यांना जर्मन न्यायाधीशांसमोर हजर करण्यापूर्वी त्यांना सोमवारपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवले जाऊ शकते, असा अंदाज अल-जझिराने व्यक्त केला आहे. त्यात प्रत्यार्पणाचा निर्णय होऊ शकतो.

असाइनमेंटवर असतानाच कारवाई
मन्सूर लोकप्रिय वृत्ताधारित कार्यक्रमाचे संचालन करतात. अलीकडेच त्यांनी अल कायदाच्या सिरियातील अल नुसरा या दहशतवादी गटाचा म्होरक्या अबू मोहंमद अल-जोलानीची मुलाखत घेतली होती. बर्लिनमध्ये ते जर्मनीतील इस्लामिक दहशतवादाच्या जाणकाराची मुलाखत घेण्यासाठी गेले होते.

सिसींची जर्मन भेट
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी ३ जून रोजी जर्मनीला भेट दिली होती. त्यांनी चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली होती. या दौर्‍यात दोन्ही देशांनी परस्परांना इस्लामिक कट्टरवाद्यांविरोधात एकत्र लढण्यावर सहमती दर्शवली होती. त्या वेळी मर्केल यांनी इजिप्तच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर नाराजी व्यक्त केली होती. इजिप्तमध्ये मृत्युदंडाची शिक्षा मोठ्या प्रमाणात होते.

वकिलाचा छळ
२०११ मध्ये ऐतिहासिक तहरीर चौकात एका वकिलाचा छळ केल्याचा ठपका मन्सूर यांच्यावर आहे. त्या प्रकरणात २०१४ मध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवताना १५ वर्षांची कैद ठोठावली होती. दुसरीकडे मन्सूर यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्याशिवाय त्यांच्यावर बलात्कार आणि दरोड्याचेदेखील आरोप आहेत. हे खटले खोट्या स्वरूपाचे आहेत, असा दावा मन्सूर यांनी केला आहे.

ट्विटवरून उघड
५२ वर्षांचे मन्सूर यांना बर्लिन विमानतळावर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी ट्विट करून ही माहिती जाहीर केली.
बातम्या आणखी आहेत...