आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक्झिट मुद्द्यावर थेरेसा मंत्रिमंडळात मतभेद शिगेला; अर्थमंत्री फिलिप हेमंड यांना माध्यमांनी केले लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या मंत्रिमंडळाला ब्रेक्झिटविषयी ठाम राहण्याचे आवाहन केले आहे. मंत्रिमंडळात याविषयी दुफळी माजल्याचे चित्र आहे. हुजूर पक्षाच्या नेत्या थेरेसा या आज आपल्या सहकाऱ्यांशी याविषयी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रिमंडळांतर्गत सुरू असलेली ब्रेक्झिटविषयीची चर्चा सार्वत्रिक होत असून गोपनीयतेला खीळ बसत असल्याचे सांगण्यात आले.  सरकारची भूमिका आणि ध्येय याकडे लक्ष केंद्रित करण्यास थेरेसा यांनी सांगितले. ब्रुसेल्स येथे सोमवारी याच्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाली. 

रविवारी ब्रिटनमधील बहुतांश वृत्तपत्रे ब्रेक्झिटविषयीच्या मतभेदांविषयीच्या बातम्यांनी भरली होती. मंत्र्यांना कठोर भाषेत थेरेसा यांनी सुनावल्याचे या वृत्तांत म्हटले आहे. अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनीही याविषयीच्या गोपनीय चर्चा लीक केल्याचा दावा करण्यात आलाय.  ८ जूनच्या मतदानात थेरेसा यांनी बहुमत गमावल्याने थेरेसा मे सध्या अल्पमतातील सरकारच्या प्रमुख आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री उघडपणे व्यक्तिगत मतप्रदर्शन करत आहेत. 

सार्वजनिक भाषणाविषयी थेरेसा देणार शिकवणी  
ब्रेक्झिट मुद्द्यांवर थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात प्रचंड वैचारिक मतभेद असून ते पक्षांतर्गत ठेवावेत. ब्रिटनच्या जनसमुदायासमोर कसे बोलावे याची शिकवणीच आज थेरेसा मे घेणार आहेत. युरोपीय महासंघातून बाहेर पडताना ब्रिटनने आपले आर्थिक हितसंबंध कसे जपावेत याविषयी आपण बोलल्याचा खुलासा अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी केला आहे. यावरून आपण गोपनीय चर्चा उघड करत असल्याचा खोटा आरोप होत असल्याचे फिलिप म्हणाले. येथील आघाडीच्या दैनिकाने एका कॅबिनेट मंत्र्याच्या नावाचा उल्लेख न करता त्याचे वक्तव्य प्रकाशित केले आहे. त्याने म्हटले आहे की, फिलिप हे ब्रेक्झिटचा अपप्रचार करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...