आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूने मैत्रिणींना लग्नाचे फोटो पाठवले, दोन तासांत वराने दिला घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध- सौदी अरेबियात एक लग्न अवघ्या दोन तासांतच संपुष्टात आले. कारण एवढेच की, वधूने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावरून आपल्या काही मैत्रिणींना पाठवले. नवरदेवाला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्याने तत्काळ पत्नीला घटस्फोट देऊन टाकला.

पत्नीविरुद्ध त्याने घटस्फोटाचा दावाही गुदरला. वास्तविक लग्नाआधी या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार कोणीही लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणार नव्हते. परंतु वधूला या कराराचा विसर पडला.

तरुणाने हा करार केला, कारण होणारी पत्नी सोशल मीडियाचा अितवापर करते हे त्याला माहिती होते. सोशल मीडियावर ती फ्रेण्ड्सशी तासन‌्तास गप्पा करते. फोटो, व्हिडिओ, मेसेजेस शेअर करते याची कल्पना त्याला होती. वधूच्या भावाने म्हटले की, माझी बहीण आणि त्याच्या पतीमध्ये लग्नाआधीच परस्परसंमतीने स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम ट्विटर आदींचा वापर करणार नसल्याचे ठरले हाेते. लग्नाच्या करारात त्याचा समावेश होता. दुर्दैवाने तिने ही अट पाळली नाही. त्यामुळेच तिच्या पतीने तलाक म्हटले आहे. नवरदेवाच्या या निर्णयामुळे वधूच्या घरचे लोक नाराज आहेत. या दोघांतील ही अटच गैरवाजवी होती. फोटो शेअर करण्यावर अशी बंदी लादणे योग्य नव्हते. नवरदेवाच्या घरच्यांचे म्हणणे वेगळे आहे. ते म्हणतात, घटस्फोटासाठी हे योग्य कारण आहे. वधूने करार मोडला आहे. तिने मैत्रिणींना फोटो पाठवण्याची काहीएक गरज नव्हती. दरम्यान, सोशल मीडियावर मात्र लोक वधूची बाजू घेताना दिसत आहेत. वधूने आपल्या मैत्रिणीला फोटो पाठवले यात तिने कोणता असा मोठा गुन्हा केला. सौदी अरेबियातील पुरुष मंडळींनी घटस्फोट थट्टेचा विषय बनवला आहे. मनाला वाटेल तेव्हा तलाक म्हणा. मुली काय बाहुल्या वाटल्या काय, असा सवाल नेटिझन्स करत आहेत.

सौदीत अलीकडे घटस्फोटांची प्रकरणे वाढली अाहेत. कायदेतज्ज्ञांच्या मते ५० टक्के काडीमोड नव्याने लग्न झालेल्यांचे आहेत. कायदेतज्ज्ञ अहम अल माबी म्हणतात, तरुणांतील घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण चिंतेचे आहे. गैरसमज, वैचारिक मतभेद जबाबदारी टाळण्याची भावना यामुळे लग्ने टिकत नाहीत. परस्परांवर विश्वास नसेल तर ते कसे टिकणार?
बातम्या आणखी आहेत...