आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय व्यावसायिकांशी ट्रम्प यांची चर्चा; माध्यमांचे आक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेण्यासाठी नेते, माजी अधिकारी यांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भारतीय व्यावसायिकांचीही भेट घेतली. मात्र, अमेरिकन माध्यमांनी या भेटींवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प हे आपल्या व्यावसायिक हितांपासून दूर राहू शकतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे, भारताची उद्योग राजधानी मुंबईतही होर्डिंग लागले असून त्यावर ,‘ट्रम्प इज बॅक’ असे लिहिले आहे.

मुंबई आणि पुणे येथे ट्रम्प टॉवर तयार होत आहे. या योजनेशी संबंधित उद्योजक सागर चोरडिया, अतुल चोरडिया आणि कल्पेश मेहता यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का आणि जावई जॅरेड कुशनर यांची न्यूयॉर्कच्या ट्रम्प टॉवरमध्ये भेट घेतली. त्यांनी ट्रम्प टॉवर भागीदारीबद्दल चर्चा केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी भारतात ट्रम्प यांच्या व्यवसायाच्या विस्तारावर भर दिला.

दरम्यान, सिनेटच्या इथिक्स समितीचे माजी अध्यक्ष रॉबर्ट एल. वॉकर यांनी म्हटले आहे की, नवनिर्वाचित अध्यक्षांनी अशा प्रकारे व्यावसायिक विस्ताराची चर्चा करणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या कारभाराच्या दैनंदिन कामांत हस्तक्षेप करणार नाहीत, असे ट्रम्प ऑर्गनायझेशनने स्पष्ट केले आहे.

ठक व कपटी म्हणणाऱ्या रोम्नींनाही भेटले ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी उदारमतवादी रिपब्लिकन नेते मिट रोम्नी यांची न्यूजर्सी येथील खासगी गोल्फकोर्स येथे भेट घेतली. निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान रोम्नी यांनी ट्रम्प यांना ठक, कपटी आणि धोकेबाज म्हटले होते. ट्रम्प यांना मते देऊ नका, असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले होते. दोन्ही नेत्यांनी जागतिक परिस्थितीवर चर्चा केली. रोम्नी हे अमेरिकेचे आगामी परराष्ट्रमंत्री होण्याची शक्यता आहे. रोम्नी २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. भेटीनंतर ट्रम्प रोम्नी यांना सोडण्यासाठी बाहेरही आले. ट्रम्प म्हणाले की, भेट चांगली झाली, पण त्यांनी पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. रोम्नी यांनी ट्रम्प यांची स्तुती केली.

चोरडिया बंधू शरद पवार यांच्या जवळचे
माध्यमांच्या वृत्तानुसार, चोरडिया बंधू पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांनी १९९० च्या दशकात आलिशान हॉटेल बांधण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचे वडील ईश्वरदास यांचा जन्म साखरेचा उद्योग करणाऱ्या कुटुंबात झाला आहे. ते साखर उद्योगाशी संबंधित राजकीय नेते शरद पवार यांच्या जवळ आले. शरद पवार महाराष्ट्र आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर मोठे नेते झाले. ते सध्या राज्यसभा सदस्य आहेत.

राजदूतांना हॉटेलमध्ये केले निमंत्रित
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील इतर देशांच्या राजदूतांना वॉशिंग्टनमध्ये बनवलेल्या आपल्या आलिशान इंटरनॅशनल ट्रम्प हॉटेलमध्ये निमंत्रित केले. त्यांना हॉटेलमधील सुविधा दाखवल्या. जेव्हा त्यांचे राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुख वॉशिंग्टनमध्ये येतील तेव्हा याच हॉटेलमध्ये थांबावे, असा आग्रह त्यांना करण्यात आला.

या देशांत आहे ट्रम्प यांचा व्यवसाय : भारत, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिरात, उरुग्वे, फिलिपाइन्स, तुर्की.
बातम्या आणखी आहेत...