आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Donald Trump Mocks Call Centres In India, But Says The Place Is 'Great'

ट्रम्पकडून भारतीयांची आधी खिल्ली; नंतर म्हणाले, महान, अमेरिकी नेतेच मूर्ख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमधील सर्वात आघाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा वाचाळपणा काही कमी झालेला नाही. एका भाषणात त्यांनी भारतीय कॉल सेंटर्सच्या प्रतिनिधीच्या इंग्रजी बोलण्याची नक्कल करून खिल्ली उडवली. पण लगेच ‘भारत महान आहे. भारतीय नेत्यांवर नाराज नाही’, अशी सारवासारवही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

डेलोव्हेयरमध्ये ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कल्पना करा. तुम्ही एका भारतीय व्यक्तीशी बोलत आहात. तो कसे काम करतो ? मी एकदा उगाच फोन केला. माझ्या कार्डबद्दल जाणून घ्यायचे आहे, असे बळेच म्हणालो. मी विचारले तुम्ही कुठले आहात ? (त्यावर ट्रम्प यांनी संभाषणाची भारतीय शैलीत नक्कल केली) मी भारतातून आलोय. त्यावर ट्रम्प फोन ठेवण्याची नक्कल करत म्हणाले, वा छान. मस्तच. एवढ्या भाषणानंतर ट्रम्प यांनी स्वत:ला सावरले. ते लगेच म्हणाले, भारत महान देश आहे. मी तेथील नेत्यांवर मुळीच नाराज नाही. मी तर आपल्याकडच्या नेत्यांवर नाराज आहे. कारण ते मूर्ख आहेत. डेलोव्हेयरमध्ये अमेरिकेतील बँकिंग व क्रेडिट कार्ड उद्योगाचे हब आहे. बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक, डेलोव्हेयर, एम अँड टी बँक, पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुपसारख्या महत्वाच्या संस्था आहेत. ट्रम्प म्हणाले, भारत, चीन, मेक्सिको, जपान, व्हिएतनामसारख्या देशांना फायदा होईल, अशा प्रकारच्या सागरी धोरणांना तुम्ही मंजुरी देऊ शकत नाहीत. एखाद्या लहान मुलाच्या हातून कँडी हिसकावून घ्यावी, तसे तुम्ही अमेरिकेच्या हातून अशा प्रकारे व्यापार खेचून घेऊ शकत नाही.
नेत्याचा विरोध मावळला
ट्रम्प यांची प्रचार माेहीम आणि रिपब्लिकन नेतृत्व यांच्यातील मतभेद आता निवळू लागले आहेत. पार्टीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष रिन्स प्रिबस यांनी ट्रम्प यांचे जाहीर समर्थन केले. एकतेमधून अनेक चमत्कार होतात, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. व्हाइट हाऊसमध्ये विजयी होण्यासाठी पक्षाच्या सर्व सदस्यांना क्लीव्हलँड संमेलनानंतर उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहावे लागेल, असे आवाहन प्रिबस यांनी केले.
हिलरींचा जोरदार हल्ला
डेमोक्रॅटिक पार्टीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आपल्या विजयाबद्दल आश्वस्त दिसत आहेत. त्यामुळेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला. पेन्सिल्व्हेनियाच्या एका रेस्तराँमध्ये क्लिंटन यांनी समर्थकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ट्रम्प यांची सामान्य महिलांविषयी कशी मते आहेत, हे मला सांगायचे आहे. ते महिलांची टिंगल करतात. अलीकडेच ट्रम्प यांनी हिलरींचा उल्लेख ‘कुटिल क्लिंटन’ असा केला होता.