आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फर्स्ट लेडी’ला महिलांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा, पत्नी मेलानिया यांच्याविषयी ट्रम्प यांच्‍या भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्या सोडवण्याची, त्यांना विविध प्रश्नी मदत करण्याची फर्स्ट लेडी मेलानियाची इच्छा आहे,  असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्नीविषयी सांगितले.  

महिलांच्या प्रश्नांवर लढा देण्याची तिची मनापासून  तयारी आहे. महिलांसाठी काहीतरी करण्याची तिची मनापासून इच्छा आहे. महिलांना खरोखरच अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच महिलांच्या लढ्याच्या दृष्टीने ती देशातील महान प्रतिनिधी ठरू शकते, असे ट्रम्प यांनी सांगितले. गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
पूर्वाश्रमीच्या मॉडेल राहिलेल्या मेलानिया (४६) सध्या न्यूयॉर्कमध्ये मुलगा बॅरोनसोबत राहतात. मुलाची शाळा सुरू असल्याने शैक्षणिक सत्र संपल्यानंतर त्या व्हाइट हाऊसमध्ये दाखल होतील. मेलानिया खूप चांगल्या फर्स्ट लेडी होतील, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. मेलानिया व ट्रम्प यांचा २००५ मध्ये विवाह झाला होता. मेलानिया मूळच्या स्लोव्हानिया वंशाच्या आहेत. 

टेक्सासचा पाठिंबा
मुस्लिम राष्ट्रातील नागरिकांना प्रवेशबंदी देण्याच्या निर्णयाला टेक्सास प्रांताने शुक्रवारी पाठिंबा जाहीर केला. असा निर्णय घेणारे हे अमेरिकेतील पहिलेच राज्य ठरले आहे. 

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला झापले..  
अर्थ क्षेत्रातील जगप्रसिद्ध दैनिक द वॉल स्ट्रीट जर्नलवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व त्यांचे सीआयए प्रमुख माइक पॉम्पिआे यांनी रोष व्यक्त केला आहे. देशाच्या गुप्तहेर संस्थेच्या अधिकाऱ्यांबद्दलचा लेख शुक्रवारच्या अंकात प्रकाशित झाला आहे. त्यामधील माहिती, दावे तद्दन खोटे आहेत. ही कृती प्रतिष्ठित दैनिकासाठी अशोभनीय आहे, असे पॉम्पिआे यांचे म्हणणे आहे.  

प्रवेश बंदीबाबतचा नवा आदेश पुढल्या आठवड्यात  
प्रवेशबंदीबाबत न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतांचा विचार करून नवा आदेश पुढल्या आठवड्यात काढण्यात येईल, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी २७ जानेवारी रोजी इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सिरिया, येमेनमधून अमेरिकेत येणाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश बजावले होते.
 
या सात मुस्लिम राष्ट्रांतील लोकांना अमेरिकेत ९० दिवस प्रवेश करता येणार नाही, असे आदेशात म्हटले होते. त्याला आक्षेप घेत जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. तीन कोर्टांनी हा आदेश स्थगित केला होता.   
बातम्या आणखी आहेत...