आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प यांनी १७० कोटी रुपये देऊन विद्यापीठाचे प्रकरण मिटवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पद सांभाळण्याच्या अगोदर एका शैक्षणिक प्रकरणात मोठे घूमजाव केले आहे. ट्रम्प विद्यापीठावरील फसवणुकीच्या खटल्यांना मिटवण्यासाठी सुमारे १७० कोटी रुपये देणार आहेत. हे खटले विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात दाखल केले होते. खटले मिटवण्यासाठी कदापिही झुकणार नाही, अशी ताठर भूमिका ट्रम्प यांनी घेतली होती.

प्रवेशासाठी ट्रम्प यांनी नेमलेल्या काही लोकांना ३५ हजार डॉलरची रक्कम द्यावी लागली होती, असा विद्यार्थ्यांचा आरोप होता. न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल एरिक श्नेडरमॅन शनिवारी म्हणाले, ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलल्याने आम्हाला धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी घूमजाव केल्यामुळे माजी पीडित ६ हजार विद्यार्थ्यांचा मोठा विजय झाला आहे. परंतु ट्रम्प यांचे वकील डॅनियल पॅट्रोसेली म्हणाले, वैयक्तिक हितांचा त्याग करून पुढे जाण्याची त्यांची इच्छा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तीन खटले दाखल करण्यात आले होते. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकले. कॅलिफोर्निया व न्यूयॉर्कमध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यापैकी एका प्रकरणात सॅन दिएगोमध्ये २८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी ट्रम्प यांच्या बाजूने करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळली. त्यावर न्यायमूर्तींनी हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचा सल्ला दिला होता.
अजूनही बरेच खटले
ट्रम्प यांना आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटमध्ये जास्त फायदा होणार नाही. त्यांच्याविरोधात असे अनेक खटले सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश खटले कोर्टाच्या बाहेर मिटवण्याचा त्यांचा इरादा नाही. कारण काही प्रकरणांत त्यांचाच विजय होईल, असा विश्वास ट्रम्प यांना वाटतो.
अॅमी बेरा सलग तिसऱ्यांदा अमेरिकन संसदेत दाखल
भारतवंशीय अॅमी बेरा यांची सलग तिसऱ्यांदा अमेरिकी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी निवड झाली. बेरा आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांत खूपच कमी फरक असल्याने त्यांच्या मतदारसंघात पुन्हा मतगणना झाली, त्यात ते विजयी झाले. याआधी भारतीय वंशाच्या नागरिकांपैकी फक्त दलीपसिंह सौंध १९५७ ते १९६३ दरम्यान सलग तीन वेळा सदस्य होते.

मागील सभागृहात बेरा हे एकटेच भारतीय वंशाचे नागरिक होते. या वेळी अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात इलिनॉयमधून राजा कृष्णमूर्ती, वॉशिंग्टनमधून रो खन्ना हे निवडून आले आहेत. त्याशिवाय कमला हॅरिस सिनेटवर निवडून आल्या आहेत. अॅमी बेरा यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे स्कॉट जोन्स यांच्यावर मात केली. बेरा याआधी २०१२ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. दरम्यान, ट्रम्प सरकारचा चेहरामोहरा कसा असेल, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. बॉबी जिंदाल, निक्की हेली, मिट रॉमनी यांच्याकडे काही खाती देण्याचा विचार ट्रम्प यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...