डॉ. बाबासाहेब आंबेडकर / डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे जपानमध्ये अनावरण

वृत्तसंस्था

Sep 11,2015 02:00:00 AM IST
टोकियो - जपानच्या कोयासन विद्यापीठात झालेल्या अनोख्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा येथील पुतळा महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेकडून कोयासन आणि जपानच्या नागरिकांना दिलेली एक अमूल्य भेट आहे. कोयासन आपल्या स्थापनेचे १२०० वे वर्ष साजरे करीत असून भारतासह जगभरात बाबासाहेबांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे औचित्य जुळून आले असल्याचे गौरवोद‌्गार मुख्यमंत्र्यांनी या वेळी काढले.
कोयासन विद्यापीठाचा परिसर गुरुवारी सकाळपासूनच गजबजून गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्री तसेच या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतीक म्हणून उपस्थित पाहुण्यांसह जपानी नेत्यांनीही उत्साहात भगवे फेटे बांधले. तुतारी वाजवून सर्वांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे डॉ. आंबेडकर आणि बुद्धिझम याविषयावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात पोवाडे व लेझीम नृत्याचा समावेश होता.
बामूचा कोसायन विद्यापीठाशी करार
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू या वेळी उपस्थित होते. या दोन्ही विद्यापीठांमध्ये संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर या करारातून भर देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यासोबत त्यांनी कोयासन येथे बौद्ध भिक्खूंसोबत प्रार्थना करण्यासोबतच १२०० वर्षे जुन्या कोयासन सँक्च्युरी येथील बौद्ध भिक्खू कोबो डायशी यांच्या पुतळ्याला तामागावा नदीचे शुद्ध जल अर्पण केले.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...

X