आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्याचे वेड लावणारा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ बीजिंग - लंडनहून हाँगकाँगला जाण्यासाठी ब्रिटिश महिला शेरॉन विमानात दाखल झाली; परंतु तिला ११ तासांचा प्रवास उभे राहूनच करावा लागला. कारण लठ्ठपणामुळे विमानातील आसनावर बसणे शक्य होत नव्हते. आपण बसलो तर समोरच्या आसनावरील महिला प्रवाशाला काही हानी होईल, अशी भीतीही तिला वाटत होती.

४३ वर्षीय डिझायनर शेरॉन यांच्यासाठी हा अनुभव अतिशय लाजिरवाणा होता. त्यांनी या प्रवासानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना नेहमीच बिझनेस ट्रिपसाठी विमानाने जावे लागत होते. त्यासाठी त्यांनी नंतर विमानाऐवजी रेल्वेचा पर्याय निवडला. त्यांना अतिशय चांगल्या नोकरीवर या वजनामुळे पाणी सोडावे लागले हाेते. त्यामुळे त्यांना फ्रीलान्स डिझायनर म्हणून काम सुरू केले होते. जेणेकरून अधिक चालावे लागू नये. त्याचबरोबर जास्तीत जास्त वेळ घरीच राहता यावे. नियमित चालण्यासाठी वेळ काढता यावा, असाही त्यांचा उद्देश होता.

गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी संकल्प केला. त्यानुसार कामाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ६४ किलो वजन कमी केले आहे. त्यांचे वजन १२५ किलो होते. आता त्यांचे वजन ६१ किलो आहे. शेरॉन यांना मात्र आता लोक लठ्ठपणा कसा सहन करतात, असे वाटते. मला तर लठ्ठपणा नेहमी दु:खी करत असे. त्या वेळी माझ्या डोक्यात नोकरीव्यतिरिक्त काहीही नव्हते. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देऊ शकले नव्हते. मी दहा वर्षांपासून लंडनहून हाँगकाँगला ये-जा करत होते; परंतु दर वेळी माझ्या पुढच्या आसनावर कोणीही बसलेले नसावे, अशी प्रार्थना करायचे. परंतु, अलीकडच्या प्रवासाची मला अजिबात चिंता नव्हती. उलट मी इकॉनॉमी क्लासने जाण्याचे ठरवले.

२०१२ चा तो वेदनादायी प्रवास होता. त्या वेळी मला बळजबरीने आसनावर बसावे लागले होते. ती स्थिती माझ्यासाठी खूप अवघडलेली होतीच, त्याचबरोबर समोरील आसनावरील महिलेसाठीदेखील त्याचा त्रास होता. म्हणून आयपॅड घेऊन उभी राहिले. संपूर्ण प्रवास मी त्या वेळी उभ्यानेच पूर्ण केला होता. समोरील महिलेला काही त्रास होऊ नये, या विचाराने मला खरोखरच अस्वस्थ केले होते. माझ्या लठ्ठपणामुळे इतरांचा प्रवास अडचणीचा का होतो? टेकऑफच्या दरम्यान उपयोगात आणली जाणारी खुर्चीदेखील फ्लाइट अटेंडंटने मला देऊ केली होती; परंतु भल्यामोठ्या जेटमध्ये उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असते. म्हणून उभे राहण्याचे मी ठरवले होते. याच निर्णयामुळे आज मी बिनधास्तपणे प्रवास करू शकत आहे.