आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगदा खोदून तुरुंगातून फरार झालेला तस्कर चापो अडकला पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको सिटी - अमली पदार्थांच्या तस्करी विश्वातील गॉडफादर अल चापो अखेर मेक्सिको पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सहा महिन्यांपूर्वी अनेक किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला होता. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिक पेना निटो यांनी स्वत: ही माहिती ट्विटरवरून दिली.

लॉस मोचिस शहरात शुक्रवारी रात्री एक बोगदा शोधताना नौदलाने त्याची धरपकड केली. त्यादरम्यान त्याच्या गँगसोबत झालेल्या चकमकीत त्याच्या टोळीतील ५ जण ठार झाले. चापोसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात चापोचा निकटवर्तीय अल चोलोचाही समावेश आहे. याअगोदर तो तीन वेळा तुरुंगातून फरार झाला होता. सुरक्षा यंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून त्याचा पाठपुरावा करत होत्या. त्याच्या गावातील एका बोगद्यावर असलेल्या काही खाणाखुणांवरून नौदलाने त्याला पकडले. त्याच्यासाठी विशेष दल तयार करण्यात येणार आहे.

सुंदर मुलींच्या माध्यमातून तस्करी : अल चापोच्या गँगमध्ये आर्किटेक्ट, इंजिनिअर आणि अकाउंटंटदेखील आहेत. त्यांचे पथक रेल्वे रुळांच्या समांतर बोगदा तयार करून अमेरिकेत सहजपणे अमली पदार्थांची बिनधास्त तस्करी करते. तस्करीसाठी ग्लॅमरस मुलींची मदत घेतली होती.

आपल्या आयुष्यावर तयार करत होता चित्रपट
चापो आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची योजना तयार करत होता. त्यासाठी तो निर्माते आणि अभिनेत्यांच्याही संपर्कात होता. म्हणूनच त्याने लॉस मोचिसच्या सागरी किनाऱ्याजवळ आपला अड्डा तयार केला होता.

अमली पदार्थ विश्वाचा ‘अतिरेकी लादेन’
अमेरिकेत अर्ध्याहून अधिक अमली पदार्थांची तस्करी चापो टोळी करत होती. अमेरिकेने त्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीस ठेवले होते. यापेक्षा अधिक रकमेचे बक्षीस यापूर्वी केवळ लादेनवर होते. म्हणूनच त्याला अमली पदार्थांच्या विश्वातील लादेन म्हटले जाते.

फोर्ब्जच्या यादीत सर्वात श्रीमंत गुन्हेगार
२००९ मध्ये फोर्ब्जच्या यादीत जगातील अव्वल अब्जाधीशांमध्ये अल चापोचे नाव झळकले होते. त्या वेळी त्याची संपत्ती एक अब्ज असल्याचे सांगण्यात आले होते. अल चापोने स्वत:च्या नावावर काहीही खरेदी केले नव्हते. अलीकडेच त्याची संपत्ती २५ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS