आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान: पतीच्या मृतदेहाखाली दबलेली महिला ओरडली, ‘मी येथे आहे, मला वाचवा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैनान - तैवानमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपात कोसळलेल्या १७ मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ४८ तासांनंतर चार जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे. त्यात एका ८ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. अजूनही शंभरावर जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

तैनान या शहरात भूकंपातील बळींची संख्या सध्या ३८ वर गेली आहे. भूकंपात एक १७ मजली इमारत पडली होती. या इमारतीखालीच अनेकांना प्राण गमवावे लागले. असे असले तरी मोजक्याच इमारतींचे नुकसान झाले आहे. तैवानमध्ये इमारत बांधकाम उच्च दर्जाचे असल्यामुळेच कमी नुकसान झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रविवारी पाच जणांना तर सोमवारी चार जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले.
बचाव पथकाने सोमवारी लिन सू-चिन या ४ वर्षांच्या मुलीला ६० तासानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. ‘ती शुद्धीत आहे. तिच्या शरीरातील पाणी कमी झालेले आहे, पण रक्तदाब ठीक आहे. शरीरावर काही जखमा झाल्या आहेत,’अशी माहिती महापौर लाइ चिंग-ते यांनी दिली.
बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांचा धीर आता सुटत चालला आहे. अनेकांनी आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी माहिती केंद्रावर गर्दी केली आहे. ताजी माहिती मिळवण्यासाठी थेट बचाव पथकातील सदस्यांशीच बोलू द्यावे, असा आग्रह काही जणांनी धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एक वृद्ध जोडपे कुटुंबीयांच्या प्रतीक्षेत केंद्रातच ठाण मांडून बसले आहे. त्यांची समजूत काढणे जिकिरीचे झाले आहे.

‘मी येथे आहे, मला वाचवा’
त्साओ वेइ -लिंग या महिलेचा शोध घेण्यासाठी बचाव पथकातील सदस्य खोदकाम करत होते. त्याच वेळी त्यांना त्साओ हिची ‘मी येथे आहे, मला वाचवा’ अशी हाक एेकू आली. ती तिच्या पतीच्या मृतदेहाखाली सापडली. भूकंपात तिचा पती आणि २ वर्षांचा मुलगा ठार झाले आहेत. तिच्या कुटुंबातील पाच जण अजूनही बेपत्ता आहेत.