आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्नियात नेपाळएवढ्या भूकंपात झाले असते १० मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नेपाळमधील भूकंपाने सारेच हादरले. रिश्टर स्केलवर ७.८ एवढ्या भूकंपाने हजारो लोकांचा बळी घेतला; परंतु भूकंपामुळे मृत्यू झाल्याचे गृहीतक सपशेल चुकीचे आहे. कारण भूकंप नव्हे, तर इमारतीच जीवघेण्या ठरतात, असा दावा अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी केला आहे. नेपाळएवढ्या तीव्रतेच्या धक्क्यांनंतरही कॅलिफोर्नियामध्ये केवळ १० ते ३० जणांना प्राण गमावावे लागले असते. सुमारे दहा हजार लोकसंख्येच्या भागात नेपाळमध्ये १ हजार, पाकिस्तान, भारत, इराण आणि चीनमध्ये सुमारे १० हजार नागरिकांचा मृत्यू झाला असता, असे तज्ज्ञांना वाटते.

तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्हाला भूकंपापासून काहीही धोका नाही; परंतु इमारतीचे बांधकाम त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. नेपाळ भूकंपप्रवण क्षेत्र असल्याची माहिती सर्वांना आहे. त्यानंतरही विशेष काळजी घेण्यात आली नाही. म्हणूनच आशियातील लोकांचा जोखीम असलेल्या ठिकाणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीच एक समस्या आहे. काठमांडू हे शहर लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या शहरांपैकी आहे. शहराचा लोकसंख्या दर ६.५ टक्के आहे. हे पाहता शहराला भूकंपामुळे धोका होताच. अनेक वर्षे काठमांडूमध्ये इमारतीसाठी आवश्यक मापदंड (बिल्डिंग कोड) नव्हते. अलीकडे तीन वर्षांपूर्वी मापदंड लागू झाले होते. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याशिवाय िनयमांची काटेकोर अंमलबजावणीदेखील व्हायला हवी, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाचे संशोधक डेव्हिड वॅड यांनी सांगितले.

दिल्लीसह जगातील अनेक शहरे विनाशाच्या उंबरठ्यावर :
टोकियो, इस्तंबूल, तेहरान, मेक्सिको सिटी, नवी दिल्ली, काठमांडू, सॅन अँड्रिस फॉल्ट, लॉस एंजलिस, सॅन फ्रान्सिस्को, ढाका, जकार्ता, कराची, मनिला, कैरो, आेसाका, लिमा इत्यादी.

बांधकाम सुरक्षा महत्त्वाची
नेपाळच्या पश्चिमेकडील पोखारा ते डेहराडून (भारत) या प्रदेशात भूगर्भात मोठी दरी आहे. त्यामुळे या भागातील इमारती, बांधकामांना धोका आहे. २०० वर्षांपासून हा धोका आहे. म्हणूनच नवीन इमारतींचे बांधकाम करताना विशिष्ट गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. अनेक वेळा येथे भेट दिली. बांधकाम खर्चावर ३ टक्के अधिक खर्च केल्यास प्राणहानी टळू शकेल.
अमोद दीक्षित, संशोधक, नॅशनल सोसायटी फॉर अर्थक्वेक टेक्नॉलॉजी.
अंदाज बांधणे कठीण
भूगर्भशास्त्रज्ञ भूकंप कोठे आणि कधी होणार यांचा नेमका अंदाज बांधू शकत नाहीत. त्यामुळे कोणतेही भाकीत करता येत नाही. शास्त्रज्ञ केवळ चुका शोधून आगामी काळात त्या टाळण्यासाठी इशारा देऊ शकतात. आगामी ३० वर्षांत भूकंपाची शक्यता म्हणूनच वर्तवता येत नाही, असे अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेच्या सुझान हाफ यांनी स्पष्ट केले.