क्विटो - जपाननंतर रविवारी सकाळी भूकंपाने इक्वेडोरला तडाखा दिला. यात २३३ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू, तर ५८८ जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. रिश्टर मापकावर भूकंपाची तीव्रता ७.८ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, भूकंपाच्या या नव्या मालिकेने तज्ज्ञही सतर्क झाले आहेत. जपान ते म्यानमार व भारतीय भूभागालाही धक्के बसत असल्याने पृथ्वीवरील भूकंपप्रवण क्षेत्र पुन्हा सक्रिय झाले आहे का, याचा तज्ज्ञ अभ्यास करत आहेत.
देशाच्या सहा प्रांतांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू क्विटोपासून १७० किलोमीटर दूर उत्तर-पश्चिम प्रशांत समुद्रकिनारपट्टीवर होता. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता आलेल्या भूकंपामुळे गुयाक्विलमध्ये एक पूल कोसळला. मंता शहरातील विमानतळावरील टाॅवरही उद््धवस्त झाला. सर्वाधिक नुकसान व्यापारी केंद्र गुयाक्विल शहरात झाले आहे.
दरम्यान, सुनामीचा इशारा परत घेण्यात आला आहे. तथापि, समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. मदत आणि बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भूकंपाची माहिती मिळताच इक्वेडोरचे राष्ट्रपती राफेल कोरेया हे इटली दौरा मध्यावरच सोडून मायदेशी परतत आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जपानच्या भूकंपात ढिगाऱ्यांखाली ११ बेपत्ता... तज्ज्ञांचे जगातील अतिसंवेदनशील भागावर लक्ष... टोंगातही ६.१ तीव्रतेचा भूकंप