आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये 3 महिन्यांची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; चर्चवर दहशतवादी हल्ल्यानंतर निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून कॉप्टिक चर्चवर हल्ला करण्यात आल्याने इजिप्तमधील वातावरण बिघडले आहे. या घटनेनंतर इजिप्तच्या राष्ट्रपतींनी देशात तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
 
दरम्यान, रविवारी करण्यात आलेल्या या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. पाम संडेच्या मुहूर्तावर करण्यात आलेला हा हल्ला अत्यंत निंदाजनक असल्याचे मत इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्तह अल सीसी यांनी व्यक्त केले आहे. 

हल्ल्यानंतर काही तासांनी रविवारी रात्री त्यांनी इजिप्तच्या राष्ट्रीय वाहिनीवरून देशात आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा केली. याच आठवड्यात ते आणीबाणीचा प्रस्ताव संसदेसमोर सादर करतील. सीसी म्हणाले, आणीबाणीच्या तीन महिन्यांच्या काळात देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. पुढील तीन दिवस देशात राष्ट्रीय शोक पाळला जाईल. दरम्यान, हल्ला झाला त्या वेळी कॉप्टिक चर्चचे प्रमुख धर्मगुरू टावाड्रोस टू हेसुद्धा चर्चमध्येच होते. मात्र, ते सुखरूप आहेत. व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस आगामी २८ आणि २९ एप्रिल रोजी इजिप्तच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला आवाहन
इजिप्तचे राष्ट्रपती सीसी यांनी दहशतवाद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची भूमिका बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे. २०१३ मध्ये लष्कराने मोहंमद मोर्सी यांनी राष्ट्रपती पदावरून हटवल्यानंतर इजिप्तमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. बहुतांश घटनांमध्ये अल्पसंख्याकांवरच निशाणा साधला जात आहे.

पोप फ्रान्सिस इजिप्तला जाणार 
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोप फ्रान्सिस यांच्या इजिप्त दौऱ्याबाबत साशंकता होती. मात्र, त्यांचा हा दाैरा २८ आणि २९ एप्रिल रोजी नियोजनाप्रमाणेच होईल, असे स्पष्टीकरण त्यांचे कार्यालयीन अधिकारी अँजेलो बेक्कीयू यांनी दिले आहे. ते म्हणाले, ही घटना निंदनीय आहे. पण, अशा घटनांमुळे पोप फ्रान्सिस शांततेचा संदेश देण्याचा त्यांचा मार्ग बदलणार नाही. हा दौरा नियोजनानुसारच होईल.
बातम्या आणखी आहेत...