कैरो - इजिप्तमधील अस्थिर राजकीय परिस्थिती व हिंसक घटनांमुळे पर्यटकांचा आेघ कमी झाला आहे. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इजिप्त सरकार बॉलीवूडच्या तारे-तारकांची मदत घेणार आहे. त्यांच्या साहाय्याने इजिप्त पर्यटनाच्या जाहिराती केल्या जातील.
या देशाच्या अर्थकारणात पर्यटनाचा मोठा वाटा आहे. मात्र, २०११ पासून कट्टरवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे येथील पर्यटन उद्योगाला मंदीचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या नाइल फेस्टिव्हलसाठी
बिग बी अमिताभने उपस्थिती लावली होती. त्यांनी इजिप्तमध्ये पर्यटन सुरक्षित असल्याचेही या वेळी सांगितले. येथील पर्यटन विकासासाठीच भारताने १८ दिवसीय नाइल फेस्टिव्हलचे आयोजन केले होते.
सांस्कृतिक घडमोडींवर परिणाम
देशातील राजकीय अस्थैर्यामुळे सांस्कृतिक घडामोडींवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून येते. मनोरंजन क्षेत्राचे त्यात अधिक नुकसान झाले आहे. पर्यटनाला तर फटका बसला आहेच; परंतु आता बॉलीवूडच्या तार्यांची मदत घेतल्यानंतर मात्र देशाकडे पर्यटक आकर्षित होतील. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरदेखील झाल्याचे पाहायला मिळेल.
२०११ नंतर घट
डिसेंबर २०१४ मध्ये पर्यटकांच्या संख्येत २७% नी वाढ झाली. फेब्रुवारी २०१५ मध्येही या टक्केवारीत वाढ दिसून आली. वर्ष २०१० मध्ये इजिप्तला १४.७ कोटी पर्यटकांनी भेट दिली होती.