लंडन - राणी एलिझाबेथ द्वितीय ९ सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये दीर्घकाळ शासन करणारी सम्राज्ञी होईल. २५ व्या वर्षी राजघराण्याची गादी सांभाळणाऱ्या महाराणीचे त्या दिवशी सत्तेवर ६३ वर्षे आणि सात महिने आणि तीन दिवस पूर्ण होतील. यातून त्या राणी व्हिक्टोरियाचा विक्रम मोडीत काढतील. त्यांनी ६३ वर्षे, सात महिने, दोन दिवस राज्य केले होते. एलिझाबेथ यांनी ६ फेब्रुवारी १९५२ रोजी वडील किंग जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूनंतर राजघराण्याचा वारसा हाती घेतला.
९ सप्टेंबर रोजी भव्य आयोजन
९ सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ आपल्या खासगी घरापासून लांब स्कॉटलँडच्या बालमोरलमध्ये स्कॉटिश बॉर्डर्स रेल्वेच्या ३० कोटी पाउंड गुंतवणुकीच्या नव्या मार्गाचे उद््घाटन करणार आहेत. महाराणींच्या बालमोरल येथील निवासस्थानी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये त्यांचे नातू युवराज विल्यम्स त्यांची पत्नी डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन सहभागी होतील. त्यांच्या शासनकाळाच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोने आणि अन्य मौल्यवान धातूंची नाणी जारी करण्यात येतील. असे असले तरी त्यांच्या दीर्घकाळच्या सत्तेवरही टीका केली जाते. टीकाकारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सिंहासन सोडून आपल्या उत्तराधिकाऱ्यांना संधी दिली पाहिजे.
व्हिक्टोरियाचे ६३ वर्षे १२६ दिवसांचे राज्य
राणी एलिझाबेथ यांची पणजी राणी व्हिक्टोरिया यांनी ६३ वर्षे आणि १२६ दिवसांपर्यंत ब्रिटिश साम्राज्य सांभाळले होते. २४ मे १८१९ रोजी जन्मलेल्या राणी व्हिक्टोरियाने २० जून १८३७ रोजी गादी सांभाळली. २२ जानेवारी १९०१ रोजी त्यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. राणी एलिझाबेथचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्यांनी ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राजगादी सांभाळली. ९ सप्टेंबर रोजी त्या राणी व्हिक्टोरियापेक्षा जास्त काळ राज्य करणारी राणी ठरणार आहे. मे २०११ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय दुसरी सर्वांत दीर्घकाळ शासन करणारी महाराणी झाली. त्या वेळी त्यांनी किंग जॉर्ज तृतीय यांचा विक्रम मोडीत काढला होता. त्यांनी ५९ वर्षे सत्ता सांभाळली. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार,ब्रिटनच्या इतिहासात दीर्घकाळापर्यंत राज्य करणाऱ्या दोन महिला आहेत ही बाब अद्भुत असून पुरुषप्रधान जगात एक आदर्श उदाहरण आहे.
१९५२ मध्ये सत्ता सांभाळली
- नऊ सप्टेंबर रोजी राणी व्हिक्टोरियाला मागे टाकत त्यांच्या सत्तेचा विक्रम होणार आहे. त्यांनी वडिलांच्या मृत्यनंतर १९५२ मध्ये २५ व्या वर्षी सत्ता सांभाळली.
- सर्वाधिक काळ जिवंत राहणारी महाराणी
- डिसेंबर २००७ मध्ये एलिझाबेथ द्वितीय सर्वात जास्त वयाच्या जिवंत राहणाऱ्या महाराणी ठरल्या होत्या. त्याआधी राणी व्हिक्टोरिया ८१ वर्षे वयापर्यत सम्राज्ञी होत्या.
- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, राष्ट्रकुल समूहातील सर्वात जास्त देशांच्या नाण्यांवर चित्र असणारी महाराणीही आहे.